Rain : आता पावसाचा जोर कमी होणार, पुन्हा या तारखेपासून राज्यात मुसळधार
IMD Weather : राज्यात तीन, चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचा जोर आता कमी होऊ लागला आहे. मान्सून कमकुवत झाल्याचा परिणाम पावसावर झाला आहे. परंतु राज्यात लवकरच मुसळधार पावसाचे आगमन होणार आहे...
पुणे | 11 सप्टेंबर 2023 : गेल्या ऑगस्ट महिन्यात मान्सून कमकुवत होता. यामुळे यंदा तब्बल १०२ वर्षानंतर सर्वात कमी पाऊस ऑगस्ट महिन्यात झाला. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात सर्वत्र पाऊस परतला. त्यामुळे धरणांमध्ये जलसाठा वाढला. परंतु आता सोमवारपासून मान्सून कमकुवत झाला आहे. यामुळे पुढील तीन दिवस कुठेही मुसळधार पाऊस पडणार नाही. त्यानंतर पुन्हा पावसाचा जोर असणार असल्याची माहिती पुणे हवामान विभागाने दिली.
राज्यात तुरळक पाऊस
कृष्ण जन्मअष्टमीला राज्यात सर्वत्र पाऊस झाला. तीन चार दिवस हा पाऊस सुरु होता. आता राज्यात सध्या कुठेही मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज नाही. पुढील तीन, चार दिवस अशीच परिस्थिती राहणार आहे. पुणे, मुंबई, कोकण, पश्चिम अन् मध्य महाराष्ट्रात मध्य स्वरुपाच्या पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी वर्तवला आहे. आता राज्यात १३ तारखेनंतर पुन्हा मान्सून सक्रीय होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
10 Sept, आज #महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पिवळ्या इशारा सह काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 13 सप्टें. पासून पावसाची क्रिया पुन्हा सुरू होत आहे.Watch for IMD updates.@imdnagpur @RMC_Mumbai @ClimateImd pic.twitter.com/1d5Tt9Q9sW
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 10, 2023
राज्यात ऑगस्ट महिन्यात मोठी तूट
राज्यात ऑगस्ट महिन्यात पावसाची मोठी तूट होती. या महिन्यात ५८ टक्के कमी पाऊस झाला. परंतु जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्यामुळे पावसाची तूट केवळ ७ टक्के होती. राज्यात पावसाची सरासरी 741.10 मिमी आहे. आतापर्यंत 692.70 मिमी पाऊस झाला आहे. पुणे जिल्ह्यात सात धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. हा विसर्ग पूर्व विभागात कमी पाऊस झाल्यामुळे केला जात आहे. या भागातील पिकांसाठी हे पाणी सोडले आहे. त्याचा फायदा शेतीला होणार आहे.
जळगाव जिल्ह्यात पाऊस
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरासह तालुक्यात रात्रभरात सरासरी ४९.१५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती. सलग दुसऱ्या दिवशी रात्री देखील शहरात पावसाने हजेरी लावली. जामनेर तालुक्यातील 17 गावांना पाणीपुरवठा करणारे तोंडापूर धरण जोरदार पावसामुळे शंभर टक्के भरले आहे. नंदुरबार जिल्ह्यातही गेल्या चार दिवसांपासून सर्वत्र समाधानकारक पाऊस होत आहे. विदर्भातही काही भागांत पाऊस पडत आहे.