MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश, विद्यार्थ्यांची मागणी झाली मान्य
मुख्यमंत्र्यांनी महिन्याभरापूर्वी आश्वासन देऊनही एमपीएससीची परीक्षा पद्धती बदलली नव्हती. त्यामुळे पुण्यातल्या परीक्षार्थींना पुन्हा गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन सुरु केले होते.
पुणे : विद्येचं माहेरघर असलेल्या पुणे येथे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलन गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरु होते. एमपीएसचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याची त्यांची मागणी होती. यासंदर्भात दोन महिन्यांपासून वारंवार विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. मुख्यमंत्र्यांनी महिन्याभरापूर्वी आश्वासन देऊनही एमपीएससीची परीक्षा पद्धती बदलली नव्हती. त्यामुळे पुण्यातल्या परीक्षार्थींना पुन्हा गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन सुरु केले होते. अखेर या आंदोलनाला यश मिळाले आहे. विद्यार्थ्यांची मागणी मान्य केल्याची माहिती मंडळाने ट्विट करत दिली आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे.
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) February 23, 2023
आंदोलकांच्या नक्की मागण्या काय?
एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा. नव्या पद्धतीच्या अभ्यासासाठी किमान 5 ते 6 महिने वेळ मिळावा. आयोगानं घाईघाईनं नवी पद्धती अमलात आणू नये.तसेच नवा अभ्यासक्रम यूपीएससीच्या अभ्यासक्रमावर आधारित असल्यानं पुस्तकं उपलब्ध नाहीत. म्हणून ती उपलब्धता करुन द्यावी, अशा प्रमुख 4 मागण्या आंदोलकांच्या आहेत.
आंदोलकांचा नव्या पद्धतीला विरोध नसून त्याच्या तातडीच्या अंमलबजावणीला विरोध होता. साधारणपणे दर 10 वर्षांनी परीक्षा पद्धतीत बदल होतो. याआधी 2014 पर्यंत एमपीएससीची परीक्षा ही वर्णनात्मक पद्धतीनंच होत होती. 2014 ते 2023 पर्यंत तीचं स्वरुप पर्यायवाचक झालं. आता 2023 मध्ये पुन्हा परीक्षेचं स्वरुप सविस्तर लेखी पद्धतीनं नियोजीत आहे.
सध्याची पद्धत कशी होती
सध्या एमपीएससी परीक्षा ऑब्जेक्टिव्ह म्हणजे पर्यायवाचक पद्तीनं होती. ज्यात प्रश्नाच्या उत्तरासाठी दिलेल्या ४ पर्यायांपैकी एक पर्याय निवडावा लागतो.पण नव्या अभ्यासक्रमानुसार एमपीएससीची परीक्षा डिस्क्रिपटिव्ह म्हणजे वर्णनात्मक होणाराय. ज्यात प्रश्नाचं उत्तर सविस्तरपणे लिहावं लागेल.
ही नवीन पद्धती जून 2023 पासून लागू होतेय. मात्र इतक्या कमी वेळेत नव्या पद्धतीचा अभ्यास करण्यास अवधी मिळावा, यासाठी ही नवी पद्धती 2023 पासून लागू करण्याची मागणी केली जातेय. कारण गेल्या चार पाच वर्षांपासून विद्यार्थी जुन्या पद्धतीने अभ्यास करत आहे. आता अचानक नवीन पद्धत केली त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार होते.