पुणे-मुंबईमधील अंतर कमी करणाऱ्या प्रकल्पाचे काम झाले किती? कुठे होतोय प्रकल्प
Mumbai Pune Expressway missing link : मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर एका प्रकल्पाचे काम वेगाने सुरु आहे. या कामांमुळे दोन्ही शहराचे अंतर कमी होणार आहे. यामुळे वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे.
पुणे | 25 ऑगस्ट 2023 : मुंबई आणि पुणे (Mumbai-Pune) हे दोन्ही शहरे राज्यासाठी महत्वाची आहेत. मुंबई देशाची आर्थिक राजधानी तर पुणे देशाची सांस्कृतिक राजधानी आहे. या दोन्ही शहरांमध्ये नियमित जाणाऱ्या लोकांची संख्याही मोठी आहे. यामुळे या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या विविध प्रकल्पांचे काम नेहमी सुरु असते. आता पुणे आणि मुंबई शहरामधील अंतर कमी करणारा प्रकल्प सुरु आहे. या प्रकल्पाचे काम 80 टक्के झाले आहे. आता सप्टेंबर 2024 पर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केली.
कुठे सुरु आहे प्रकल्पाचे काम
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील लोणावळा ते खोपोली एक्झिट या भागात पर्यायी रस्त्यासाठी बोगदा तयार केला जात आहे. या ठिकाणी एक बोगदा 1.75 किलोमीटर लांब तर दुसरा 8.93 किलोमीटरचा आहे. यामुळे मुंबई आणि पुणे शहराचे अंतर 13 किलोमीटरने कमी होईल. या प्रकल्पाला मिसिंग लिंक नाव दिले असून प्रकल्पाचे 80 टक्के काम पूर्ण आहे.
दादा भुसे यांनी केली पाहणी
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी मिसिंग लिंक प्रकल्पावर जाऊन पाहणी केली. त्यानंतर ते म्हणाले, ‘ मिसिंग लिंक प्रकल्प 13 किलोमीटर लांबीचा आहे. यासाठी दोन बोगदे करण्याचे काम वेगाने सुरु आहे. सध्या प्रकल्पाचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. या ठिकाणी 180 मीटर उंचीचा पूल आणि देशातील सर्वात जास्त रुंदीचा बोगदा तयार होत आहे. मिसिंग लिंक सुरु झाल्यानंतर लोणावळा, खंडाळा दरम्यान होणारी वाहतूक कोंडी कमी होईल.
आठ पदरी रस्ता
मिसिंग लिंकमुळे बोर घाटात पर्यायी मार्ग मिळणार आहे. या प्रकल्पाला प्रारंभ लोणावळ्यातून होत आहे. त्यानंर खोपोलीत हा बोगदा संपणार आहे. देशातील सर्वात मोठा बोगदा हा आहे. या बोगद्याची रुंदी 23.5 मीटर इतकी आहे. या प्रकल्पामुळे दोन्ही शहराचे अंतर कमी होणार आहे आणि प्रवाशांचा वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. यामुळे प्रकल्प पूर्ण होण्याकडे लक्ष लागले आहे.