मुंबई-पुणे-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांची मिळाली का पसंती? 45 दिवसांमध्ये किती झाली कमाई
सोलापूर मुंबई पुणे मार्ग जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांनी चांगलीच पसंती दिलीय. मागील पंचेचाळीस दिवसात तब्बल 50 हजार प्रवाशांनी वंदेभारत एक्स्प्रेसने प्रवास केलाय. आता उन्हाळाच्या सुटीसाठी वंदे भारत एक्स्प्रेसचे बुकींग फुल झाले आहे.
सोलापूर : भारतीय रेल्वेचा विस्तार वेगाने सुरु झाला आहे. रेल्वेने सुरु केलेली वंदे भारत एक्स्प्रेस अनेक मार्गावरुन जात आहे. आता पुणेकरांसाठी वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाली आहे. मुंबई-पुणे-सोलापूर (Mumbai-Pune-Solapur Route) मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) धावत आहे. ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ ला पुणेकरांनी चांगलाच प्रतिसाद दिलाय. सोलापूरवरुन मुंबई जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) १० फेब्रुवारी २०२३ रोजी केले होते.
किती झाली कमाई
सोलापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांनी चांगलीच पसंती दिलीय. मागील पंचेचाळीस दिवसात तब्बल 50 हजार प्रवाशांनी वंदेभारत एक्स्प्रेसने प्रवास केलाय. 45 दिवसांमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसने चार कोटी रुपयांपेक्षा अधिकचे उत्पन्न कमविले आहे. सोलापूर ते पुणे आणि पुणे ते मुंबई यां पल्ल्यात 100 टक्के तर सोलापूर ते मुंबई या पल्ल्यात 70 टक्के लोकांनी प्रवास केलाय. लवकरच उन्हाळी सुट्टी सुरु झाल्यानंतर गाडीचे बुकिंग अधिक होईल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केलाय.
आठवड्यातून सहा दिवस चालेल
वंदे भारत एक्स्प्रेस सोलापूरहून सकाळी 6.50 वाजता सुटते. पुण्यात सकाळी 9 वाजता पोहचते. त्यानंतर दुपारी 12.30 वाजता मुंबईला पोहचते. मुंबईवरुन दुपारी 4.10 वाजता ही गाडी निघते. सायंकाळी साडेसातच्या सुमारास पुण्याला पोहचते. रात्री 10.40 वाजता सोलापूरला पोहचते. ही सेवा आठवड्यातून सहा दिवस उपलब्ध असेल. ही एक्स्प्रेस बुधवारी मुंबईतून आणि गुरुवारी सोलापूरहून धावणार नाही.
मेक इन इंडिया ट्रेन
देशभरात ही ट्रेन नव्या युगाची ट्रेन मानली जात असून तिला ‘मेक इन इंडिया’ मोहिमेंतर्गत तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे तिची प्रवासी वाहण्याची क्षमता ही ‘शताब्दी एक्स्प्रेस’ पेक्षा अधिक आहे. पहिली वंदेभारत वाराणसी ते दिल्ली, दुसरी दिल्ली ते काटरा, तिसरी मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, चौथी दिल्ली ते चंदीगड, पाचवी चेन्नई ते म्हैसूर तर सहावी बिलासपूर ते नागपूर दरम्यान सुरू करण्यात आली आहे.
आसने अधिक आरामदायी
वंदेभारतच्या 75 रेकची निर्मिती पहिल्या टप्प्यात होणार असून त्यात जरी चेअरकारचे डबे असले तरी तिची आसने आता अधिक आरामदायी करण्यात आली आहेत. ही ट्रेन वीजेवर धावणारी असल्याने पॉवर जनरेटर कार जोडायची गरज राहत नाही. त्यामुळे तिची प्रवासी वाहण्याची क्षमता शताब्दी पेक्षा जादा आहे. एकूण 1128 इतकी प्रवासी क्षमताआहे.