Pune crime : डोक्यात दगड टाकून तरुणाची हत्या; पंधरा दिवसातली खेड तालुक्यातली दुसरी घटना
घटनेची माहिती मिळताच आज सकाळी घटनास्थळी पोलीस दाखल झाले. घटनास्थळी मोठा दगडही आढळून आला आहे. याच दगडाच्या साह्याने खून केला असल्याची माहिती समोर येत आहे.
राजगुरूनगर, पुणे : खेड तालुक्यातील पूर्व भागातील एसईझेड परिसरात एका 25 वर्षीय तरुणाचा डोक्यात दगड टाकून (Stone in the head) खून केला असल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना दिली आहे. घटनास्थळी खेड पोलिसांनी (Khed Police) धाव घेत तपास सुरू केला आहे. दरम्यान, गेल्या पंधरा दिवसातली ही खुनाची दुसरी घटना असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. या तरुणाची ओळख पटविण्यात खेड पोलिसांना यश आले असून अजय भालेराव असे या खून झालेल्या 25 वर्षीय तरुणाचे नाव आहे. हा तरूण खेड तालुक्यातील निमगाव येथील कोहळा ठाकरवाडी येथे राहणारा आहे. निमगाव हद्दीत सेझजवळ (SEZ) शिरूर-भीमाशंकर राज्यमार्गाच्या बाजूलाच ही घटना घडली आहे.
पेट्रोलिंग असूनही…
घटनेची माहिती मिळताच आज सकाळी घटनास्थळी पोलीस दाखल झाले. घटनास्थळी मोठा दगडही आढळून आला आहे. याच दगडाच्या साह्याने खून केला असल्याची माहिती समोर येत आहे. खेड तालुक्यात गुन्हेगारी वाढत असताना या गुन्हेगारीवर वचक ठेवणे पोलिसांसमोर एक आव्हान निर्माण झाले आहे. पोलिसांची रात्री पेट्रोलिंग सुरू असूनदेखील अशा घटना घडत असल्याचे दिसून येत आहे.
पंधरा दिवसांतली दुसरी घटना
गेल्या पंधरा दिवसांतली ही दुसरी खुनाची घटना आहे. अनेक खून हे रात्रीच्या सुमारास घडले असल्याने रात्रीचा बंदोबस्त, तसेच पेट्रोलिंग वाढविणे गरजेचे आहे. गुन्हेगारांना गुन्हेगारासारखी वागणूक देणे गरजेचे असताना त्यांच्या मैत्रीपूर्वक वागणुकीने गुन्हेगार राजरोसपणे गुन्हेगारी करत आहेत, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
डोक्याला 74 टाके
मागील आठवड्यात वाडा येथील महेश प्रभाकर पावडे या 35 वर्षीय तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यामध्ये या तरुणाच्या डोक्यात 74 टाके पडले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी असून त्याची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे. तरीही पोलिसांनी आरोपीवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करणे गरजेचे असताना किरकोळ मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. आश्चर्य म्हणजे आरोपी राजरोसपणे फिरत आहे. त्यामुळेच पोलीस आरोपींना पाठीशी घालतात का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.