Gram Panchayat Election Result | मराठवाड्यात अजित पवारांचीच ‘दादागिरी’, शरद पवार गटाला मोठा धक्का
अजित पवारांचा गट, भाजप आणि शिंदे गटासोबत आल्यानं, त्याचा फायदा भाजपला अर्थात महायुतीला होईल का? अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्याचीच झलक अजित पवार गटानं ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून दाखवून दिलीय. ज्या पद्धतीनं अजित पवार गटच नाही तर भाजपनंही ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवता त्यावरुन आगामी लोकसभेतही मोठा विजय मिळवणार असा विश्वास महायुतीचे नेते व्यक्त करतायत.
पुणे| 6 नोव्हेंबर 2023 : ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून, अजित पवारांनी पश्चिम महाराष्ट्रात आपला दबदबा दाखवून दिलाय. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीची चांगलीच ताकद आहे. मात्र फुटीनंतर ऐन लोकसभा निवडणुकीआधी अजित पवारांनी काका शरद पवारांना धक्का दिल्याची चर्चा आहे. बारामती तालुक्याचाच विचार केला तर, बारामती तालुक्यात एकूण 32 ग्रामपंचायतींचा निकाल लागला, ज्यात अजित पवार गटानं निर्विवाद 30 ग्रामपंचायतींवर झेंडा फडकवला. तर शरद पवार गटानं बारामतीच्या 32 ग्रामपंचायतींमध्ये पॅनलच उभं केलं नव्हतं. विशेष म्हणजे बारामतीत पहिल्यांदाच भाजपनं 2 ग्रामपंचायती जिंकल्या.
राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर, ही पहिलीच निवडणूक आहे आणि यानंतर महापालिकेच्या निवडणुका होतील, अशी अजिबात चिन्हं नाहीत. म्हणजेच आता थेट लोकसभेच्याच निवडणुका आहेत. पूर्ण पश्चिम महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालाचा जर विचार केला तर, दादांचा गट काका पवारांच्या गटापेक्षा वरचढ ठरल्याचं स्पष्ट दिसतंय.
कोणत्या जिल्ह्यात कोणी बाजी मारली?
- कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 91 ग्रामपंचायतींपैकी अजित पवार गटानं 23 ग्रामपंचायती जिंकल्या. तर शरद पवार गटाचं खातंही उघडलं नाही
- पुणे जिल्ह्यात 238 ग्रामपंचायतींपैकी अजित पवार गट 109 तर शरद पवार गटानं 22 ग्रामपंचायती जिंकल्यात.
- सोलापूर जिल्ह्यात एकूण 111 ग्रामपंचायतींपैकी अजित पवार गटानं 15 ग्रामपंचायती जिंकल्या. तर शरद पवार गटानं 2 ग्रामपंचायती जिंकल्यात
- सातारा जिल्ह्यात एकूण 146 ग्रामपंचायतींचा निकाल लागला. त्यात अजित पवार गटानं 36 तर शरद पवार गटानं 24 ग्रामपंचायतींवर विजय मिळवला
- सांगली जिल्ह्यात एकूण 97 ग्रामपंचायतींपैकी अजित पवार गटानं 2 तर शरद पवार गटानं 22 ग्रामपंचायची जिंकल्यात.
महायुतीचा लोकसभेत सर्वाधिक जागा जिंकण्याचा दावा
अजित पवारांचा गट, भाजप आणि शिंदे गटासोबत आल्यानं, त्याचा फायदा भाजपला अर्थात महायुतीला होईल का? अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्याचीच झलक अजित पवार गटानं ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून दाखवून दिलीय. ज्या पद्धतीनं अजित पवार गटच नाही तर भाजपनंही ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवता त्यावरुन आगामी लोकसभेतही मोठा विजय मिळवणार असा विश्वास महायुतीचे नेते व्यक्त करतायत. त्यातही राष्ट्रवादीची ताकद असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार गटापेक्षा अजित पवार गटानं आपली ताकद दाखवली. पश्चिम महाराष्ट्रात एकूण 10 लोकसभेच्या जागा आहेत. सध्या राष्ट्रवादीचे दोन्ही गट म्हणून पाहायचं झालं तर तिन्ही खासदार शरद पवार गटाचे आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील खासदारांची यादी
- सातारा- श्रीनिवास पाटील- शरद पवार गटाचे खासदार
- शिरुर अमोल कोल्हे- शरद पवार गटाचे खासदार
- बारामती – सुप्रिया सुळे शरद पवार गटाच्या खासदार
- सांगली- संजय काका पाटील- भाजपचे खासदार
- सोलापूर- जय सिद्धेश्र्वर स्वामी- भाजपचे खासदार
- माढा- रणजित सिंह नाईक निंबाळकर- भाजपचे खासदार
- पुण्याचे भाजपचे खासदार होते दिवंगत गिरीश बापट, त्यांच्या निधानानंतर पोटनिवडणूक झालेली नाही
- हातकणंगले – धैर्यशील माने- शिंदे गटाचे खासदार आहेत
- कोल्हापूर – संजय मंडलिक- शिंदे गटाचे खासदार आहेत
- मावळ- श्रीरंग बारणे – शिंदे गटाचे खासदार
ग्रामपंचायतीच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढल्या जात नाही. पण त्या त्या पक्षाचे पॅनल नक्कीच असतात. त्यात काका पुतण्याच्या लढाईत पुतणे अजित पवारांनी ग्रामपंचायतीत बाजी मारली. आता पुढची लढाई लोकसभेचीच असेल.