‘होय, आम्ही नामदेवराव जाधव यांना काळं फासलं’, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षाने जबबादारी स्वीकारली
राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी नामदेव जाधव यांच्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनी 'टीव्ही 9 मराठी'ला प्रतिक्रिया देत असताना हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. नामदेव जाधव यांनी शरद पवार यांच्याविरोधात वारंवार टीका केल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळं फासलं, अशी प्रतिक्रिया प्रशांत जगताप यांनी दिली.
पुणे | 18 2023 : प्राध्यापक नामदेव जाधव यांना पुण्यात काळं फासल्याचा प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी नामदेव जाधव यांना काळ फासलं आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी नामदेव जाधव यांच्यावरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. प्रशांत जगताप यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “आम्ही आजच्या या आंदोलनाची जबादारी स्वीकारतो. होय, आम्ही नामदेवराव जाधव यांना काळं फासलं. या नामदेव जाधवांना विक्रोळी पोलिसांनी खंडणीच्या गुन्ह्याखाली अटक केली होती. एका शाळेत पैसे देवून मुलांचे मार्क्स वाढल्याप्रकरणी त्याची हकालपट्टी करण्यात आली होती. आणि आज तो शरद पवार यांच्यावर टीका करतोय”, असं प्रशांत जगताप म्हणाले.
“लोकशाहीमध्ये टीका करण्याचा अधिकार आहे. पण तो खऱ्या पुराव्यावर करावी. शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणात 60 वर्षांपासून जास्त कालावधीपासून आहेत. त्यांच्यावर नाहक खोटे आरोप केले जातात. हे आरोप होत असताना पुरावे सादर केले जात नव्हते. पुरावे असते तर निश्चित टीका करावी. आम्ही आठ दिवसांचा कालावधी दिला होता. आम्ही त्यांना इशारा देवूनही ती भाषा थांबवली नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्या तोंडाला काळं फासवलं”, अशी प्रतिक्रिया प्रशांत जगताप यांनी दिली.
नामदेव जाधव यांची हल्ल्यानंतर पहिली प्रतिक्रिया काय?
नामदेव जाधव यांनी संबंधित घटनेनंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “मराठा आरक्षणाचे मारेकरी शरद पवारच असल्याचे कागदपत्रे माझ्या हाती लागले होते. ते वास्तव असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तो राग अनावर झाला नाही. आमचा आज कार्यक्रम होता. तो कार्यक्रम या लोकांनी उधळून लावला. त्यानंतर मी पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी माझ्याविरोधात हल्ला केला आहे”, अशी प्रतिक्रिया नामदेव जाधव यांनी दिलीय.
“मी असं समजतो की, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचं नाव घेणाऱ्या गुंडांनी शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा खून केलाय. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जगभरात जाऊ नयेत यासाठी त्यांनी माझ्यावर हल्ला केलाय. पोलिसांनी मला वाचवण्याचा प्रयत्न केला. एकप्रकारे हा लोकशाहीवर हल्ला आहे”, असं नामदेव जाधव म्हणाले.
“याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मी मागणी करतो. मी माझ्या वैयक्तिक गोष्टीसाठी भांडत नव्हतो तर मराठा समाजासाठी भांडत होतो. 5 कोटी मराठ्यांवरली हा हल्ला आहे, असं समजायला हरकत नाही. मी या प्रकरणात कार्यकर्त्यांना जबाबदार धरणार नाही. या प्रकरणात पहिलं नाव शरद पवार आणि दुसरं नाव रोहित पवार यांचं असणार आहे. त्यांची आमदारकी, खासदारकी रद्द करण्यासाठी मी प्रचंड मोठं पाऊल उचलणार आहे”, असं नामदेव जाधव म्हणाले.