शरद पवार यांना ‘एनडीए’मध्ये येण्याची ऑफर, मोदी मंत्रिमंडळातील मंत्र्याची खेळी
Sangali News : राज्यात काही दिवसांपासून अजित पवार भारतीय जनता पक्षामध्ये येणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यावर मोदी मंत्रिमंडळातील एका नेत्याने मोठे वक्तव्य केले. त्यांनी शरद पवार यांना एनडीएमध्ये सामील होण्याची ऑफर दिलीय.
सांगली : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हेच भावी मुख्यमंत्री असल्याची चर्चा रंगली आहे. अनेक ठिकाणी अजितदादा भावी मुख्यमंत्री असे बॅनर लागत आहेत. अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यास सासूरवाडीतही महाराष्ट्राच्या मनातील भावी मुख्यमंत्री अजितदादा असं लिहिलेली बॅनर्स झळकले आहेत. त्याच वेळी अजित पवार भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी या चर्चा फेटाळल्या. त्यानंतर अजित पवार यांनी आपण राष्ट्रवादी सोडणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले. आता मोदी मंत्रिमंडळातील एक मंत्र्यानेही शरद पवार यांनाच राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) येण्याची ऑफर दिली आहे.
कोणी दिली शरद पवार यांना ऑफर
सांगली येथे पत्रकार परिषदेत रामदास आठवले म्हणाले की, आम्हाला भाजपमध्ये अजितदादांची आवश्यकता नाही. सध्या अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यात मुख्यमंत्री पदासाठी चढा-ओढ सुरू आहे. आम्हाला शरद पवार यांनी राजकारण शिकवले आहे. त्यांच्यासारख्या अनुभवी लोकांनी एनडीएमध्ये यावे. जॉर्ज फर्नांडिस आणि नितीश कुमार यांच्यासारखे विविध विचारसरणीचे लोकही एनडीएमध्ये सामील झाले आहे. त्यामुळे पवार साहेबांनी या प्रस्तावावर विचार करावा, असे रामदास आठवले यांनी सांगितले.
पवार साहेबांनी निर्णय घ्यावा
आठवले पुढे म्हणाले की, मी एनडीएमध्ये आलो आहे, तर पवार साहेबांनी यायला हरकत नाही. आता शरद पवार यांनी ठोसपणे निर्णय घ्यावा, त्यांचाबरोबर कोणी यावे हे, असे सांगण्यापेक्षा शरद पवार यांनी आमच्या सोबत यावे, असे मत देखील मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे.
मी मुख्यमंत्री होण्यास तयार
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री होण्यासाठी आपण इच्छुक असल्याचं त्यांनी सांगलीत म्हटलं आहे. सांगली येथे पत्रकार परिषदेत रामदास आठवले म्हणाले की, आजकाल प्रत्येकजण मुख्यमंत्री होण्याच्या शर्यतीत आहे. मात्र, कुणाकडे बहुमत असेल तरच हे शक्य आहे. याबाबत चर्चाही खूप होत आहे. मला सांगायचे आहे की, मलाही मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. मी मुख्यमंत्री व्हायला तयार आहे, असे आठवले यांनी सांगितले. परंतु एकनाथ शिंदे चांगले काम करत आहेत. त्यामुळे दुसऱ्यांना संधी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.