शरद पवारांचा मेगाप्लॅन, मोहोळमध्ये 26 वर्षीय सिद्धी कदम यांना उमेदवारी, सर्वात कमी वयाच्या उमेदवार ठरण्याची शक्यता
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमधून शरद पवार गटाकडून माजी आमदार रमेश कदम यांची कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सिद्धी कदम या महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाच्या उमेदवार असण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचंड कामात व्यस्त आहेत. शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी पद्धतशीरपणे रणनीती आखली आहे. शरद पवार यांनी मोहोळसाठी ज्या उमेदवाराची घोषणा केली ते पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. खरंतर शरद पवार यांचा यामागे एक चांगला विचार असण्याची शक्यता आहे. पण शरद पवार यांच्या पक्षाने जाहीर केलेला मोहोळचा उमेदवार जिंकून आला तर महाराष्ट्राच्या राजकारणात नवा रेकॉर्ड लिहला जाऊ शकतो. शरद पवार यांच्या पक्षाने मोहोळ मतदारसंघात माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. रमेश कदम हे जामिनावर बाहेर आहेत. अण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळात झालेल्या घाटोळा प्रकरणात रमेश कदम यांना सलग 8 वर्षे जेलमध्ये राहावं लागलं. याशिवाय आगामी काळात त्यांचा जामीन रद्द झाला तर पुन्हा जेलमध्ये जावं लागलं तर त्यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते. यामुळे शरद पवार गटाने रमेश कदम यांच्या कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी दिल्याची चर्चा आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमधून शरद पवार गटाकडून माजी आमदार रमेश कदम यांची कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सिद्धी कदम या महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाच्या उमेदवार असण्याची शक्यता आहे. 2019 च्या विधानसभेदरम्यान रमेश कदम जेलमध्ये असताना कन्या सिद्धी कदम यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती. आता त्यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे मोहोळ विधानसभेत अजित पवार गटाचे यशवंत माने विरुद्ध शरद पवार गटाच्या उमेदवार सिद्धी कदम असा सामना रंगणार आहे.
जावयांना आमदार करण्यासाठी सासऱ्यांनी फिल्डिंग?
दरम्यान, खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेनेला मतदारसंघ सुटल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटात खळबळ उडाली आहे. त्यामुळे खेड आळंदीत महाविकास आघाडीत बंडोखोरीची शक्यता आहे. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अतुल देशमुख यांनी मेळावा आयोजित करुन प्रचंड शक्तिप्रदर्शन केलं. या मेळाव्यात अतुल देशमुख निवडणुकीबाबत आपली भूमिका जाहीर करणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण होतं. या मेळाव्यात भाषण करताना अतुल देशमुख यांनी मोठा गौप्यस्फोट केला. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात दोन बड्या नेत्यांच्या जावयांना आमदार करण्यासाठी सासऱ्यांनी फिल्डिंग लावल्याचा गौप्यस्फोट अतुल देशमुख यांनी केला.
अतुल देशमुख शरद पवार गटाचे प्रबळ दावेदार आहेत. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा तिढा कायम असताना भोसरीचे आमदार विलास लांडे यांनी जावई सुधीर मुंगसेंना आमदार करण्यासाठी महाविकास आघाडीत फिल्डिंग लावली आहे, असा दावा अतुल देशमुख यांनी केला आहे. तसेच यावरुन अतुल देशमुखांनी विलास लांडेंना थेट सुनावलं आहे. काळजी करु नका खेड आळंदीचा निकाल अतुल देशमुखच ठरवणार, असं म्हणत अतुल देशमुखांनी भोसरीचे आमदार विलास लांडे, तसेच खेडचे नेते नानासाहेब टाकळकर यांना थेट आव्हान दिलं आहे. अतुल देशमुखांनी मेळावा घेत भूमिका जाहीर केली आहे. आपण राष्ट्रवादी शरद पवार गटातच रहाणार असल्याचे देखील त्यांनी जाहीर केलं आहे.