ठाकरे गटाला आणखी एक धक्का, उद्धव ठाकरे यांच्या गटातील मोठा नेता जाणार शिंदे सेनेत
uddhav thackeray eknath shinde : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणखी एक धक्का बसणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटातून मोठ्या नेत्या शिंदे यांच्या गटात जाणार आहेत. त्यामुळे विधान परिषदेतील उद्धव ठाकरे गटाचे संख्याबळही कमी होणार आहे.
योगेश बोरसे, पुणे : राज्यातील राजकारणात वर्षभरापासून उद्धव ठाकरे यांना मोठे धक्के बसत आहेत. एक एक नेते त्यांना सोडून जात आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदार गेल्यानंतर अनेक धक्के उद्धव ठाकरे यांना बसले आहे. आता आणखी एक धक्का उद्धव ठाकरे यांना बसणार आहे. शिवसेना ठाकरे गटातून आणखी एक नेत्या शिंदे गटात दाखल होणार आहे. हा प्रवेश शुक्रवारीच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदही गमावण्याची वेळ येणार आहे.
कोण जाणार शिंदे गटात
विधान परिषदेतील शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत नुकतेच शिवसेनेत प्रवेश केला होता. विधान परिषदेतील विप्लव बाजोरिया हे सुद्धा शिंदे गटात दाखल झाले होते. त्यानंतर आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे शिंदे यांच्या गटात जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे विधान परिषदेतील शिवसेना ठाकरे गटाची संख्या अजून कमी होणार आहे.
काय म्हणतात दानवे
नीलम गोल्हे या ठाकरे गटाच्या महत्वाच्या नेत्या आहेत. त्या उपनेत्याही आहेत. तसेच विधान परिषदेच्या उपसभापतीसुद्धा आहेत. त्यांच्या ठाकरे गटाच्या प्रवेशासंदर्भात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना विचारले असता त्यांनी या चर्चेला नकार दिला. नीलम गोऱ्हे या लढाऊ नेत्या आहेत. त्या शिंदे गटात जातील, असे मला वाटत नाही, असे दानवे यांनी म्हटले आहे.
कोण कोण जाणार गोऱ्हे यांच्यासोबत
शिवसेना नेता नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेतील महिला आघाडीत मोठे काम केले आहे. त्याचसोबत बचत गटांसाठी त्यांनी काम केले आहे. त्यांच्यासोबत पुणे जिल्ह्यातील काही बचतगटांमधील महिला कार्यकर्तेही जाणार असल्याचे म्हटले जात आहे. शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या असलेल्या नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेची राजकीय नेहमी आक्रमकपणे जनतेसमोर मांडली आहे. स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून त्यांनी महिलांसाठी मोठे काम केले आहे.