Indorikar Maharaj : इंदोरीकर महाराजांचं मुला-मुलीच्या जन्माबाबत सम-विषम वक्तव्य, 8 महिन्यांनी कोर्टाचा मोठा निकाल
इंदोरीकर महाराजांविरोधातील खटला संगमनेर कोर्टानं रद्द केला आहे. (Nivrutti Maharaj Indorikar )
अहमदनगर: प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांना वादग्रस्त वक्तव्यासंबंधी दिलासा मिळाला आहे. लिंग भेदभावाला प्रोत्साहन देणारं वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरुन संगमनेर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. आता इंदोरीकर महाराजांना कोर्टाचा दिलासा मिळाला आहे. संगमनेर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने इंदोरीकर महाराज यांचे अपील मंजूर केले आहे. दिवाणी न्यायालयाने दिलेल्या प्रोसेस इश्यू विरोधात त्यांनी अपील केले होते. न्यायालयाने इंदोरीकर महाराजांच्या बाजूने निकाल देत खटला रद्द करण्यात आला आहे.(Nivrutti Maharaj Indorikar got relief in case of girl child born statement)
इंदोरीकर महाराजांच्या समर्थकांचा जल्लोष
संगमनेर जिल्हा सत्र न्यायालयानं इंदोरीकर महाराज यांच्या बाजूनं निकाल दिल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी पेढे वाटून जल्लोष केला.
काय आहे प्रकरण?
“स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते” असं वादग्रस्त वक्तव्य महाराज इंदोरीकर यांनी केले होते. लिंग भेदभाव करणाऱ्या या वक्तव्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने इंदोरीकर महाराजांना पीसीपीएनडीटी कायद्यानुसार नोटीस बजावत स्पष्टीकरण मागितलं होतं. यावर दिलेल्या कालावधीच्या अखेरच्या दिवशी इंदोरीकरांनी आपल्या वकिलामार्फत उत्तर देत खुलासा केला होता.
अंनिस सह सामाजिक संघटनांची न्यायालयात
इंदोरीकर महाराज यांचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. काही सामाजिक संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली होती.
इंदोरीकर महाराज यांनी हे वक्तव्य कुठे आणि कधी केले, याबाबत कुठलाही पुरावा नसल्याचं कारण देत मार्च महिन्यात अहमदनगर जिल्हा प्रशासनाने गुन्हा दाखल केला नव्हता. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रंजना गवांदे यांनी याबाबत पाठपुरावा करुन या प्रकरणाचे पुरावे जिल्हा आरोग्य विभागाला दिले. त्यानंतर 26 जून रोजी संगमनेर कोर्टात जिल्हा आरोग्य प्रशासनाने इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. संगमनेर कोर्टाने इंदोरीकर महाराज यांना समन्स बजावले असून कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिलं होतं.
संबंधित बातम्या
मुला-मुलीच्या जन्माबाबत सम-विषम वक्तव्य भोवलं, इंदोरीकर महाराजांवर गुन्हा
Indorikar Maharaj | इंदोरीकर महाराजांना कोर्टात हजर राहावंच लागणार!
(Nivrutti Maharaj Indorikar got relief in case of girl child born statement)