chandani chowk Bridge : आता पुणे वाढवू नका, आहे तेवढेच राहू द्या, नितीन गडकरी यांनी असे का म्हटले?
chandani chowk Bridge : पुणे शहरातील चांदणी चौक पुलाचे लोकार्पण शनिवारी झाले. यावेळी केंद्रीय दळवणळण मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक उपाय सांगितले. पुणे मेट्रोला उशीर का झाले? हे ही सांगितले.
योगेश बोरसे, पुणे | 12 ऑगस्ट 2023 : पुणे शहरातील चांदणी चौकाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम शनिवारी झाला. या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनेक प्रस्ताव मांडले. परंतु आता पुणे वाढवू नका, आहे तेवढेच राहू द्या, असे आवाहन करत पुणेकरांच्या मनातील भावना बोलून दाखवल्या. पुणे शहरात मेट्रोला उशीर अभ्यासू लोकांमुळेच झाला. पण आता इतर प्रकल्पांच्या योजनांना लवकर मंजुरी द्या, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.
पुणे शहरातील प्रदूषण असे कमी होणार
मी लहान असताना माझ्या बहिणीकडे स्वारगेटला येत होतो. त्यावेळी मला आठवते पर्वतीवरुन गार हवा येत होती. परंतु आता ही हवा हरवली आहे. पुणे सर्वाधिक प्रदूषित शहर झाले आहे. यामुळे आता पुणे अधिक वाढवू नका. पुणे प्रदूषित करु नका. पुणे शहरातील हवा, पाणी आणि आवाजाच्या प्रदूषणापासून मुक्त करायचे आहे. पुण्याला पेट्रोल, डिझेलपासून मुक्त केले तर चाळीस टक्के प्रदूषण कमी होईल. त्यासाठी इथेनॉल, मिथेनॉल आणि हायड्रोजन याचा वापर वाढवा. पुणे शहरात स्काय बसचा प्रकल्प राबता येईल, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.
कचऱ्यापासून वीजनिर्मिती नको
पुणे शहरात कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प सुरु करण्याची योजना आहे. परंतु कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प करु नका, त्याऐवजी ग्रीन हायड्रोजन तयार करा. तेच भविष्य आहे. पुण्यातील कचऱ्याचा उपयोग रिंग रोड तयार करण्यासाठी केला तर पुण्यात कचरा उरणार नाही. आम्ही आमचे टॉयलेटचे पाणी विकून 300 कोटी रुपये कमावतो, असे गडकरी यांनी सांगितले.
चांदणी चौकाला नवीन नाव
चांदणी चौक नाव कसे पडले, हे अजित पवार यांनी सांगितले होते. आता चांदणी चौकाचे नवीन नाव दोन्ही दादांनी म्हणजेच चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांनी मिळून ठरवावे. मी त्याला मान्यता देईल, असे गडकरी यांनी सांगितले. पुण्याच्या विकासासाठी चाळीस हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आलाय. यामधे दोन- तीन मजली उड्डाणपूल आहेत.