Pune crime : ‘RSS संघराज’ अकाऊंटवरून महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह आणि विकृत लिखाण, पुणे सायबर पोलिसांत गुन्हा दाखल
'RSS संघराज' या अकाऊंटवरून छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत अत्यंत आक्षेपार्ह आणि विकृत पद्धतीने लेखन करण्यात आले आहे.
पुणे : सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह (Offensive), विकृत लिखाण केल्याप्रकरणी पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीच्या लाइव्ह प्रसारणादरम्यान आरएसएस संघराज (RSS Sanghraj) या अकाउंटवरून हे विधान करण्यात आले होते. ‘RSS संघराज’ या नावाने फेक अकाउंट उघडून त्याद्वारे सोशल मीडियावर आक्षेपार्ह विधान करण्यात आले होते. सोशल मीडियावरचे हे आक्षेपार्ह विधान आता भोवले आहे. याप्रकरणी पुण्यात सायबर पोलीस स्टेशनमध्ये (Pune Cyber Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश करपे यांनी यासंदर्भात तक्रार दिली होती. त्यानंतर सायबर पोलिसांनी ‘RSS संघराज’ या फेक नावाने सोशल मीडियात लिखाण करणाऱ्या खातेधारकावर गुन्हा दाखल केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्याकडून निषेध आणि कारवाईची मागणी
‘RSS संघराज’ या अकाऊंटवरून छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत अत्यंत आक्षेपार्ह आणि विकृत पद्धतीने लेखन करण्यात आले आहे. वृत्तवाहिनीच्या लाइव्ह चॅनेलवरील कमेंट बॉक्समध्ये एकापाठोपाठ एक अशा कमेंट्स करत वादग्रस्त लिखाण करण्यात आले. ह्याची नोंद @DGPMaharashtra, @MumbaiPolice ह्यांनी घ्यावी. अकाऊंट कुणाचे आहे ह्याची माहिती घ्यावी आणि कारवाई करावी @Dev_Fadnavis, अशा आशयाचे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी करत संबंधित विकृतावर कारवाईची मागणी केली आहे.
विविध कलमांतर्गत गुन्हा
प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर पुणे पोलिसांनी याची दखल घेतली आहे. या आक्षेपार्ह लिखाणाबद्दल संबंधित खातेधारकावर कलम 153-अ, 465, 469, 500, 505 (2) यांसह माहिती व तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सायबर पोलीस करत आहेत.
अनेक अकाऊंट फेक, कारवाईची मागणी
सोशल मीडियावरील विविध प्लॅटफॉर्मवर अनेक फेक अकाऊंट काढण्यात आले असून या माध्यमातून आक्षेपार्ह, विकृत लिखाण केले जात असल्याचे अनेक यूझर्सना आढळून आले आहे. या माध्यमातून सरकारचा अजेंडा चालवणे त्याचप्रमाणे समाजात दुफळी निर्माण होईल, अशा पोस्ट करून वातावरण भंग करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा पेजेसवरही कारवाई करण्याची मागणी होत आहे.