पार्थ पवार यांची राजकारणात एन्ट्री? मुलासाठी अजित पवार यांनी केली ही सोय
ajit pawar and parth pawar | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार राजकारणात चांगलेच स्थिरावले आहेत. भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहेत. आता त्यांचे पुत्र पार्थ पवार यांची राजकारणात एन्ट्री होणार आहे. सहकारच्या माध्यमातून ते राजकारणात येणार आहे.
योगेस बोरसे, पुणे | 27 ऑक्टोंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री गेली अनेक वर्ष राजकारणात सक्रीय आहे. आता त्यांच्यानंतर त्यांच्या परिवारातील सदस्य राजकारणात येणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या लोकसभेसाठी बारामती मतदार संघातून निवडणूक लढणार असल्याची चर्चा होत आहे. परंतु त्यापूर्वी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार राजकारणात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अजित पवार यांनी पार्थ पवार यांना सहकारच्या माध्यमातून राजकारणात आणण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी त्यांनी जिल्हा बँकेची निवड केली आहे. पार्थ पवार जिल्हा बँकेची निवडणूक लढवणार आहे.
का होणार जिल्हा बँक निवडणूक
जिल्हा बँकेच्या रिक्त झालेल्या संचालकपदासाठी निवडणूक ८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. अजित पवार यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर ही निवडणूक होणार आहे. ८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी पार्थ पवार यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. पार्थ पवार यांच्यासोबत मदन देवकाते यांचे नाव संचालकपदाच्या निवडणुकीसाठी घेतले जात आहे. परंतु पार्थ पवारच ही निवडणूक लढण्याची सर्वाधिक शक्यता आहे.
पार्थ पवार यांची राजकारणात एन्ट्री
सहकार चळवळ पुणे जिल्ह्यात रुजवण्यात शरद पवार आणि अजित पवार यांची महत्वाची भूमिका आहे. यामुळे सहकाराच्या माध्यमातून पार्थ पवार यांना राजकारणात आणण्याची शक्यता आहे. पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदाची निवडणूक सहकार खात्याकडून होणार आहे. ८ नोव्हेंबर रोजी ही निवडणूक होणार असून दुपारपर्यंत निकाल येण्याची शक्यता आहे.
बारामती अ वर्गाची निवडणूक
अजित पवार बारामती अ वर्ग मतदार संघातून निवडून आले होते. त्यांनी संचालकपदाचा राजीनामा दिल्यानंतर या वर्गाची निवडणूक होणार आहे. उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीमुळे त्यांनी राजीनामा दिला होता, असे सांगितले जात आहे. परंतु पार्थ पवार यांच्यासाठी जागा निर्माण करावी, म्हणून तर त्यांन राजीनामा दिला नाही, अशी शक्यता आहे.