शरद पवार यांना धमकी देणाऱ्यास अटक, ‘नर्मदाबाई पटवर्धन’ नावाने चालवत होता फेसबुक पेज
Sharad Pawar Threat : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दोन दिवसांपूर्वी धमकी देण्यात आली होती. पवार यांना धमकी देणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. पुण्यातून आरोपीला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडीत पाठवले आहे.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दोन दिवसांपूर्वी देण्यात आली होती. राजकारण महाराष्ट्राचे या फेसबुक पेजवरून शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यावर नर्मदाबाई पटवर्धन असं नाव आहे. शरद पवार भाX खाव तुझा लवकरच दाभोळकर होणार, अशी धमकी या फेसबुकवरून देण्यात आली होती. शरद पवार यांना धमकी देणाऱ्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहे. पुणे पोलिसांनी धमकी देणाऱ्यास अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी दिली आहे.
कोण आहे धमकी देणारा
फेसबुक आणि ट्विटरवर शरद पवार यांनी धमकी मिळाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे तातडीने पोलीस आयुक्तांना भेटल्या होत्या. त्यांनी पोलीस आयुक्तांना भेटून या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. उपमुख्यमंत्री अन् गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना त्वरीत कारवाईचे आदेश दिले होते.
आता शरद पवार यांना धमकी दिल्याप्रकरणी पुणे शहरातून सागर बर्वे (३४) याला अटक करण्यात आली. त्यानेच दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांना ‘नर्मदाबाई पटवर्धन’ या फेसबुक पेजवरुन ‘तुमचा लवकरच दाभोलकर करू’ अशी धमकी दिली होती. पोलिसांनी तांत्रिक तपास केल्यानंतर ‘नर्मदाबाई पटवर्धन’ या नावाचे फेसबुक पेज पुण्यातील इंजिनिअर सागर बर्वे चालवत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याला अटक केली. सागर बर्वे हा आयटी इंजिनिअर आहे. याप्रकरणी आरोपीला न्यायालयानं 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
भाजप कार्यकर्त्याकडून पोस्ट
अमरावतीचा सौरभ पिंपळकर यानेही ट्विटवरून शरद पवार यांची औरंगजेबाशी तुलना करणारी आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांकडे त्याची तक्रार केली होती. सौरभ हा भाजपचा कार्यकर्ता आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणी तातडीने तपास सुरु केला आहे.
दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार धमकी प्रकरणी प्रतिक्रिया दिली होती. धमकी देणे हे आमच्या रक्तात नाही. जो कुणी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्या धमकी प्रकरणावर दिली होती.