गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा वचक राहिला नाही; ठाकरेंच्या शिलेदाराचा थेट निशाणा
Ambadas Danve on Devendra Fadnavis : ठाकरे गटाच्या नेत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र डागलंय. हे केवळ राजकारणात गुंतलेत, त्याचं राज्याकडे लक्ष नाही, असं ठाकरे गटाच्या नेत्यानं म्हटलं आहे. फडणवीस यांचा वचक राहिला नाही, असाही घणाघात या नेत्यानं केला आहे.
रणजित जाधव, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पिंपरी चिंचवड | 05 जानेवारी 2024 : उल्हासनगरमध्ये गोळीबार झाला. यांचा बॉस वर्षा आणि सागर बंगल्यावर बसल्याने हे लोकांना गोळ्या घालत आहेत. जीव घेतायेत. गुंडांच्या गळ्यात गळे घालत आहेत. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा वचक राहिलेला नाही. महाराष्ट्रात फडणवीस यांच्या कायदा सुव्यवस्थेवर धाक राहिला नाही. हे लोक केवळ राजकारणात गुंतलेले आहेत. यांचं राज्याकडे लक्ष नाही, असं म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये बोलत होते.
“गुंडांचं उदात्तीकरण केलं जातंय”
उल्हासनगरमध्ये झालेल्या गोळीबारावर अंबादास दानवे यांनी भाष्य केलं. भाजप आमदारच गोळीबार करतोय. ज्याला गोळ्या घातल्यात तोही धुतल्या तांदळाचा नाही. मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र हे वर्ष बंगल्यावर पुण्यातील कुख्यात गुंडा भेटतात. तेच उत्तर देतील. तपासणी करून आत सोडतात तरीही आशा प्रकारे गुंड जात असेल तर अनेक प्रश्न उपस्थित होतायत. पुण्यातील गुंडांचं उदात्तीकरण केलं जातंय. हे चुकीचं आहे. असे गुंड मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जात असतील तर हे राज्य गुंडांचं आहे, असं अंबादास दानवे म्हणालेत.
अजित पवारांवर निशाणा
पुणे आणि पिंपरी- चिंचवडच्या पोटनिवडणुकी वेळी तुरुंगातून अनेक गुंडांना सोडवण्यात आलं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हॉटेलमध्ये जाऊन भेटीगाठी घेतल्या. याची माहिती आमच्याकडे आहे. त्या गुंडांची चौकशी झाली पाहिजे. सर्रास या गुंडाचा वापर निवडणुकीत होतो. सर्वसामान्य जनतेच्या मनात धाक निर्माण करायचा आणि राजकीय हित साधायचं आहे, असं म्हणत अंबादास दानवे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरही दानवेंनी भाष्य केलं. मराठा समाजाची या सरकारने फसवणूक केली आहे. म्हणूनच आज मनोज जरांगे पाटील यांच्यावर पुन्हा उपोषणाला बसण्याची वेळ येत आहे. ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे, असं अंबादास दानवे म्हणाले.