‘मोदींनी पुलवामातील शहिदांचा राजकीय वापर केला, विकास नव्हे तर विखार हा मोदींचा अजेंडा’
पंतप्रधान मोदी यांच्याच अहंकारामुळे भारतीय अर्थव्यवस्था रसातळाला गेली. | PM Narendra Modi Prithviraj Chavan
पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासाचा नव्हे तर विखाराचा राष्ट्रीय अजेंडा राबवत असल्याची जळजळीत टीका काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केली. मोदी आणि अमित शाह यांचा कारभार दडपशाहीचा आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 रद्द करुन मोदींनी दंडुकेशाही राबवली. बहुमत नसताना कायदा मंजूर केला आणि हिंदू-मुस्लिम वाद उभा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलावामतील शहिदांचा राजकीय वापर केला. मात्र, गलवान खोऱ्यात 20 भारतीय जवानांचा बळी जाऊनही पंतप्रधान मोदी शांत राहिले. देशाच्या गेल्या 45 वर्षाच्या इतिहासात कधीही अशी घटना घडली नव्हती, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले. (Congress leader Prithviraj Chavan take a dig at PM Narendra Modi)
ते रविवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर चौफेर टीका केली. पंतप्रधान मोदी यांच्याच अहंकारामुळे भारतीय अर्थव्यवस्था रसातळाला गेली. कोरोना सुरु होण्यापूर्वीच भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर निच्चांकी होता. सध्याच्या घडीला भारताचे दरडोई उत्पन्न बांगलादेशपेक्षाही कमी आहे. आत्मनिर्भरतेच्या नावाखाली पंतप्रधान मोदी यांनी अनेक सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करुन त्यांची वाट लावली, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
‘मोदींच्या घोषणा फसव्या, लॉकडाऊनचे कुठलेच नियोजन नाही’
कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी लॉकडाऊन लादताना पंतप्रधान मोदी यांनी कुठलेही नियोजन केले नव्हते. त्यामुळे अनेक स्थलांतरित कामगारांचा बळी गेला. कोरोनामुळे देशभरात साडेबारा हजार कोटी रुपयांचे रोजगार गेले. त्यांना मोदी सरकारने कुठलीही मदत दिली नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
कोरोनाच्या काळात मोदी सरकारने केवळ घोषणा केल्या. प्रत्यक्षात या सर्व घोषणा फसव्या निघाल्या. केंद्र सरकारने देशातील नागरिकांना मोफत लस देणे अपेक्षित होते. पण मोदी सरकारने लसीकरणाची जबाबदारी राज्य सरकार आणि उद्योगपतींवर ढकलली, असा आरोपही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
‘गरीबांनी मरावं, श्रीमंतांनी जगावं हीच मोदी सरकारची इच्छा’
मोदी सरकारला केंद्रात सत्तेत येऊन सात वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. आधी आजार द्यायचा मग सत्कार करायचा ही भाजप सरकारची दुटप्पी भूमिका आहे, असं सांगतानाच देशातील गरीबांनी मरावं आणि श्रीमंतांनी जगावं हीच मोदी सरकारची इच्छा आहे, अशी घणाघाती टीका नाना पटोले यांनी केली.
आधी आजार द्यायचा मग सत्कार करायचा ही भाजपची दुटप्पी भूमिका आहे. कोरोनावर वेळीच उपचार झाले असते तर अनेकांचे जीव गेले नसते. पण मोदी सरकारने टाळ्या-थाळ्या वाजवून देशावासियांना अंधश्रद्धेच्या खाईत लोटलं. मग आता सत्कार कराय करताय?, असा सवाल करतानाच सुटाबुटाचं सरकार म्हटल्यावर भाजपला त्रास झाला. पण पंचतारांकीत हॉटेलमध्ये लसीकरणाची भूमिका भाजपची आहे. गरीबांनी मरावं आणि श्रीमंतांनी जगावं असं मोदी सरकारला वाटतंय, असे पटोले यांनी म्हटले.
संबंधित बातम्या:
गरीबांनी मरावं, श्रीमंतांनी जगावं हीच मोदी सरकारची इच्छा; नाना पटोलेंचा घणाघात
आमच्या कार्यक्रमात तुम्ही काय करताय?; भाई जगताप पोलिसांवर भडकले
अजूनही नेहरुंच्याच पुण्याईवर देश चाललाय; संजय राऊतांचा भाजपला टोला
(Congress leader Prithviraj Chavan take a dig at PM Narendra Modi)