Modi In Pune: पूर्वी भूमीपूजन व्हायचं पण लोकार्पणाची शाश्वती नसायची; मोदींचा काँग्रेसला चिमटा
आज पुण्याच्या विकासाशी संबंधित अनेक अन्य प्रकल्पाचं उद्घाटन आणि भूमीपूजनही झालं आहे. पुणे मेट्रोच्या भूमीपूजनाला तुम्ही मला बोलावलं होतं. आता लोकार्पणाचीही तुम्ही मला संधी दिली. हे माझं सौभाग्य आहे.
पुणे: आज पुण्याच्या (pune) विकासाशी संबंधित अनेक अन्य प्रकल्पाचं उद्घाटन आणि भूमीपूजनही झालं आहे. पुणे मेट्रोच्या भूमीपूजनाला तुम्ही मला बोलावलं होतं. आता लोकार्पणाचीही तुम्ही मला संधी दिली. हे माझं सौभाग्य आहे. पूर्वी भूमीपूजन व्हायचं, पण लोकार्पण कधी होणार याची शाश्वती नसायची, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी काँग्रेसवर (congress) जोरदार निशाणा साधला. तसेच वेळेवर प्रकल्प पूर्ण केले जाऊ शकतात हे याचं उदाहरण आहे, असा टोलाही मोदींनी लगावला. यावेळी मोदींनी भाषणाची सुरुवात मराठीत केली. तसेच पुण्यातील सर्व समाजसुधारक आणि क्रांतीकारकांचं स्मरण करून त्यांना अभिवादन केलं. आमचे सरकार पुणेकरांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी अनेक आघाड्यांवर काम करत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात आले आहेत. मोदी यांनी पालिकेत आल्यानंतर सर्व प्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसनारुढ भव्य पुतळ्याचं अनावरण केलं. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर मोदी महाराजांच्या पुतळ्याजवळ गेले. यावेळी त्यांनी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले आणि छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार उदयनराजे भोसले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते. यावेळी मोदींच्या हस्ते मेट्रोचं लोकार्पण करण्यात आलं. तसेच पुण्यातील विविध विकास प्रकल्पांचंही मोदींकडून लोकार्पण करण्यात आलं.
मराठीतून सुरुवात
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, यांच्यासह अशा अनेक प्रतिमांसह कलाकार समाजसेवकांच्या वास्तव्यानं पावन झालेल्या पुण्यानगरीतील माझ्या बंधूभगिंना माझा नमस्कार, असं म्हणत मोदींनी आपल्या भाषणाची मराठीत सुरुवात केली. त्यावेळी पुणेकरांनी टाळ्या वाजवून आणि मोदी मोदींचा गजर करत जोरदार स्वागत केलं. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. स्वातंत्र्य लढ्यात पुण्याचं ऐतिहासिक योगदान राहिलं आहे. टिळक, आगरकर, चाफेकर बंधू, सेनापती बापट, गोपालकृष्ण देशमुख, भांडारकर आणि रानडेंसारखे अनेक स्वातंत्र्य सैनिकांना मी श्रद्धांजली अर्पण करतो, असं ते म्हणाले.
राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळेल
आज महाराष्ट्राच्या विकासासाठी समर्पित असलेल्या रामभाऊ म्हाळगी यांची पुण्यतिथी आहे. आज बाबासाहेब पुरंदरेंनाही मी आदरपूर्वक स्मरण करतो. काही वेळापूर्वी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिमेचं लोकार्पण केलं. आपल्या सर्वांच्या मनात सदा सर्वदा असलेल्या छत्रपतींची प्रतिमा युवा पिढीत आणि येणाऱ्या पिढीत राष्ट्रभक्तीची प्रेरणा जागृत करेल, असंही त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या: