PM Modi visit maharashtra : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्रात, देहू आणि मुंबईतल्या कार्यक्रमांत होणार सहभागी; कसा असेल दौरा? वाचा…
पुणे आणि मुंबई असा हा दौरा आहे. या दौऱ्यानिमित्त मोठी पोस्टरबाजी भाजपातर्फे (BJP) करण्यात आली आहे. दुसरीकडे या दौऱ्याला अनेकांनी विरोध देखील केला आहे. काही स्थानिक प्रश्नांच्या संदर्भात हा विरोध होत आहे. तर वादही पाहायला मिळत आहेत.
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मुख्यत: पुण्यातील देहू आणि नंतर मुंबई काही शासकीय कामांच्या उद्घाटनानिमित्त ते राज्याच्या दौऱ्यावर आहे. दुपारी देहूतील संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचे (Sant Tukaram Maharaj shila mandir) उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. तर त्यानंतर ते मुंबईमधील जलभूषण इमारत आणि राज भवन येथील क्रांतीकारक गॅलरीचे उद्घाटन करणार आहेत. त्यासोबतच संध्याकाळी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सयेथे मुंबई समाचारच्या द्विशताब्दी महोत्सवात सहभागी होणार आहेत. पुणे आणि मुंबई असा हा दौरा आहे. या दौऱ्यानिमित्त मोठी पोस्टरबाजी भाजपातर्फे (BJP) करण्यात आली आहे. दुसरीकडे या दौऱ्याला अनेकांनी विरोध देखील केला आहे. काही स्थानिक प्रश्नांच्या संदर्भात हा विरोध होत आहे. तर वादही पाहायला मिळत आहेत.
‘असा’ असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा
– उद्या (14 जून) दुपारी 1:45च्या सुमाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी देहू येथील श्रीसंत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचे उद्घाटन करतील.
– संध्याकाळी 4:45च्या सुमाराला मुंबईमधील जलभूषण इमारत आणि राज भवन येथील क्रांतिकारक गॅलरीचे उद्घाटन करतील.
– संध्याकाळी 6च्या सुमाराला मुंबईतल्या बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबई समाचारच्या द्विशताब्दी महोत्सवात सहभागी होणार.
भाजपा कार्यकर्त्याचा विरोध
भाजपा युवा मोर्चाचे माजी उपाध्यक्ष सचिन काळभोर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जाहीर विरोध केला आहे. देहूरोड, देहूगाव, तळवडे, मोशी, दिघी, बोपखेल, निगडी, चिखली, चऱ्होली, भोसरी, कासारवाडी, पिंपरी या गावातील संरक्षण क्षेत्रातील बाधित जमीन असून सातबारा उताऱ्यावर रेड झोन शिक्का मारण्यात आले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून रेड झोनप्रश्नी अनेक आंदोलने, मोर्चे काढण्यात आले. मात्र अद्याप यावर तोडगा निघालेला नाही, असे सचिन काळभोर यांचे म्हणणे आहे. पंतप्रधान मोदी यांनी याप्रश्नी तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी काल केली होती.
पोस्टरवरून वाद
संत ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचून संत तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढविला. पिंपरी-चिंचवड शहरात भाजपाने मोदींचा फोटो पांडुरंगापेक्षा जाणीवपूर्वक मोठा दाखवून वारकरी संप्रदायाचा अवमान केला आहे. वारकरी संप्रदायामध्ये विठ्ठलापेक्षा कोणीही मोठा नसताना मोदींचा फोटो मोठा दाखवून वारकरी संप्रदायाचा अपमान केला आहे, असा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी या बॅनरचे काही फोटो ट्विट करत भाजपावर हल्लाबोल चढवला. त्यामुळे पंतप्रधान मोदी राज्यात येण्याआधीच वादाला सुरुवात झाली आहे.