Pune rain politics : मुसळधार पावसानंतर पुण्यातलं राजकीय वातावरण तापलं, भाजपा-राष्ट्रवादी आमनेसामने
पावसामुळे पुणेकरांना जो त्रास झाला त्याला सर्वस्व महापालिकेत असणारे तत्कालीन भारतीय जनता पार्टीचे (BJP) सरकार कारणीभूत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता. मात्र राष्ट्रवादीच्या या आरोपाला भाजपानेदेखील प्रत्युत्तर दिलेले पाहायला मिळत आहे.
पुणे : मुसळधार पावसानंतर पुणेकरांना झालेल्या त्रासाला सर्वस्वी भाजपा जबाबदार आहे, असा आरोप राष्ट्रवादीने (NCP) केला आहे. पुण्यात काल झालेल्या मुसळधार पावसाने पुणेकरांची मोठी तारांबळ उडालेली पाहायला मिळाली होती. शहरात अनेक ठिकाणी गुडघ्यावर पाणी साचले होते. यामुळे पुणेकरांची गैरसोय झाली होती. शहरातील अनेक भागातील घरांमध्येदेखील पावसाचे पाणी (Heavy rain) घुसले होते. पण आता यावरून पुणे शहरात राजकारणदेखील तापलेले दिसून येत आहे. काल झालेल्या पावसामुळे पुणेकरांना जो त्रास झाला त्याला सर्वस्व महापालिकेत असणारे तत्कालीन भारतीय जनता पार्टीचे (BJP) सरकार कारणीभूत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता. मात्र राष्ट्रवादीच्या या आरोपाला भाजपानेदेखील प्रत्युत्तर दिलेले पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी भाजपावर जोरदार हल्ला केला तर भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी पलटवार केला आहे.
‘प्रशासनाची मनमानी’
ज्या पक्षाचे लक्ष फक्त टेंडरवर असते, अशा भाजपाला पुणेकरांनी निवडून दिले. 99 नगरसेवकांनी काय केले, हे पाहून पुणेकर डोक्याला हात लावत आहे. मागील पावसामध्ये रस्त्याची पूर्णत: चाळण झाली होती. एकही रस्ता असा नव्हता, जिथे खड्डा नाही. तर कालच्या पावसात या सगळ्यांची परिसीमा झाली. पुणेकरांना ही संध्याकाळ विसरता येणार नाही. टेंडरची मलई खाणारे नागरिकांच्या प्रश्नांची कधीच उत्तरे देणार नाहीत. दुसरीकडे जिल्ह्याला पालकमंत्री नसल्याने प्रशासन मनमानी करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी केला आहे.
‘मुलभूत सुविधाही पुरवल्या नाहीत’
भाजपाने राष्ट्रवादीच्या या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. काल झालेल्या परिस्थितीला पूर्णतः काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जबाबदार असल्याचा पलटवार भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केला आहे. जेव्हापासून शहरात महापालिका अस्तित्वात आली, तेव्हापासून महापालिकेवर यांची सत्ता होती. त्यावेळेला त्यांनी शहरासाठी कुठले आणि काय नियोजन केले, असा सवाल मुळीक यांनी राष्ट्रवादीला विचारला आहे. मुलभूत सुविधाही पुरवल्या नाहीत. नालेसफाई यांच्या काळात नीट झाली नाही. पुढील 50 वर्षांचा विचार सत्ता असताना करायचा असतो, मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीने काहीही केले नाही, असे मुळीक म्हणाले.