Pune Farmer | काही महिन्यांपूर्वी टोमॅटोने तर आता डाळिंबाने दिला सर्वोच्च भाव
Pune Farmer Pomegranate | पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही महिन्यांपूर्वी टोमॅटोने चांगले दिवस आणले होते. त्यानंतर मात्र टोमॅटोचे दर घसरले. आता डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले आहे. कधी नव्हे इतका दर डाळिंबाला मिळाला आहे.
पुणे | 2 ऑक्टोंबर 2023 : देशातील शेतकऱ्यांना नेहमी बिकट परिस्थितीचा सामना करावा लागतो. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीचे संकट शेतकऱ्यांसमोर असते. ही संकटे आली नाही तर शेतमालास भाव मिळत नाही. या परिस्थितीत शेतकरी पुन्हा नवीन जोमाने काम करत असतो. हा हंगाम नाही तर पुढचा हंगाम चांगला येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असते. पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोने चांगला दर दिला होता. टोमॅटो उत्पादक काही शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांची कमाई झाली होती. परंतु त्यानंतर टोमॅटोचे दर घसरले आणि टोमॅटो रस्त्यावर फेकण्याची वेळी आली. आता डाळिंबाने चांगले दिवस शेतकऱ्यांना आणले आहे.
किती मिळाला डाळिंबाला दर
पुणे जिल्ह्यातील आळेफाटा बाजार समितीत डाळिंबाला आतापर्यंतचा सर्वोच्च दर सोमवारी मिळाला. डाळिंबाच्या 20 किलोच्या एका क्रेटला 14 हजार 500 रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे व्यवस्थापक प्रशांत महाबरे यांनी दिली. आळेफाटा बाजार जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत येतो. हा उपबाजार कांद्यांचा लिलावासाठी प्रसिद्ध आहे. आता डाळिंबाचा लिलाव होऊ लागला आहे. बाजार समितीत अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील शेतकरी विवेक अविनाश रायकर यांनी आपले डाळिंब आणले होते.
क्रेटला काय मिळाला दर
विवेक रायकर यांच्या डाळिंबास वीस किलोच्या एका क्रेटला तब्बल 14 हजार 500 रुपयांचा भाव मिळाला आहे. म्हणेजच एका किलोस 725 रुपये हा सर्वोच्च दर मिळाला. दुसऱ्या डाळिंबाच्या एका क्रेटला 11 हजार तर तिसऱ्या क्रेटला 10 हजार रुपये दर मिळाला. त्यांचा चार नंबरच्या डाळिंबास सहा हजार तर पाच नंबरच्या डाळिंबाच्या एका क्रेटला चार हजार दर मिळाला. बाजार समितीत डाळिंबाला चांगला दर मिळाल्यामुळे हे मार्केट चर्चेत आले आहेत आणि शेतकरी समाधानी झाला आहे.
पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील शेतकरी रमेश गाडेकर यांच्या डाळिंबाला गेल्या आठवड्यात चांगला दर मिळाला होता. त्यांच्या 26 किलो डाळिंबाच्या एका क्रेटला 16 हजार रुपये मिळाले होते. म्हणजेच किलोस 615 हा दर त्यांना राहाता बाजार समितीत मिळाला होता.