Honey Trap : पुणे हनी ट्रॅप प्रकरणातील प्रदीप कुरुलकर नेमके दडवतोय काय? आता होणार उघड
Pune News Honey Trap : पुणे शहरात उघड झालेले हनी ट्रॅप प्रकरणात प्रदीप कुरुलकर याच्यावर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले आहे. त्यानंतर आता प्रदीप कुरुलकर याची पॉलिग्राफ चाचणी करण्याची मागणी तपास संस्थेने केली आहे.
योगेश बोरसे, पुणे | 22 जुलै 2023 : पुणे येथील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅप प्रकरणात अडकले आहे. पाकिस्तानी गुप्तहेर महिलेच्या जाळ्यात अडकून त्याने देशातील गोपणीय माहिती दिली. या प्रकरणी एटीएसने तपास करुन पुणे न्यायालयात दोन हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. आता तपास संस्थाने पॉलीग्राफ चाचणी आणि व्हाइस लेअर चाचणी करण्याची मागणी एटीएसच्या वकिलांनी केली. या चाचणीला प्रदीप कुरुलकर याच्याकडून विरोध करण्यात आला आहे.
सरकारी वकिलांनी काय केले
डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर याच्या व्हाईस लेअर चाचणी आणि सायकोलॉजिकल ॲनलिसिस चाचणीस परवानगीची गरज नाही. या चाचणीतून कुरुलकर काय माहिती दडवतोय, ते समोर येणार आहे. या चाचणीत आरोपीविरुद्ध कोणत्याही गोष्टींचा वापर केला जाणार नाही. पॉलीग्रॉफ अन् लाय डिटेक्टर चाचणीला परवानगी हवी असते, असा लेखी युक्तीवाद एटीएसकडून सादर करण्यात आला. आता या विषयावर २ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
न्यायालयाने काय म्हटले होते
प्रदीप कुरुलकर याची व्हाईस लेअर चाचणी आणि पॉलीग्राफ चाचणी करण्याची मागणी तपास संस्थेकडून वकील विजय फरगडे यांनी केली होती. त्यावर दोन्ही चाचण्यांमधील फरक स्पष्ट करण्याचे आदेश न्यायाधीश एस.बी.कचरे यांनी दिले होते. या चाचण्यांना प्रदीप कुरुलकर याने विरोध दर्शवला होता. आता २ ऑगस्ट रोजी यासंदर्भात न्यायालय निर्णय देणार आहे.
काय आहे प्रकरण
डीआरडीओचे संचालक असलेल्या प्रदीप कुरुलकर याने पाकिस्तान हेर झारा दासगुप्ता हिच्या संपर्कात होते. तिला देशातील अनेक गुपित माहिती दिली. भारतीय क्षेपणास्त्रांची माहिती दिली. तसेच ब्रह्मोस, अग्नी या क्षेपणास्त्राची गुपिते दिली. मिसाईल लाँचरबाबतही माहिती पाकिस्तानला पुरवली. एटीएस आणि एनआयएने प्रदीप कुरुलकर यांची कसून चौकशी केली. त्यानंतर सुमारे दोन हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. प्रदीप कुरुलकर सध्या येरवडा कारागृहात आहे. आता त्याच्या व्हाईस लेअर चाचणीसंदर्भात न्यायालय काय निर्णय देते, याकडे लक्ष लागले आहे.