48 वाहनांचा चुराडा करणारा ‘तो’ ट्रक चालक कोण? कुठे आहे? नवले ब्रीज अपघात Update
सोमवारी सकाळपर्यंत अपघातग्रस्त वाहनांना बाजूला सारण्याचं काम सुरु होतं.
प्रदीप कापसे, पुणेः भर थंडीत पुणेकरांना सुन्न करणारा नवले ब्रीजवरच्या (Navle Bridge) अपघातात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ब्रीजवरून उतरताना एकानंतर एक अशा 48 वाहनांना धडका देणारा ट्रक (Truck Accident) नेमका कुठे आहे, ट्रकचा चालक कोण आहे, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.रविवारी रात्री झालेल्या या अपघात (Pune Accident) प्रकरणी सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
सातऱ्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या या ट्रकची पासिंग आंध्र प्रदेशची होती. मनीलाल यादव, असे ट्रक चालकाचे नाव असल्याचे पोलिसांच्या माहितीत उघड झाले आहे. हा ट्रक चालक मध्य प्रदेशचा आहे. सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सध्या हा चालक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
Horrible #ACCIDENT at #NavaleBridg Pune e …. minimum of 20-30 #vehicles involved,,,,,,,,,,,,,,,,#Puneaccident pic.twitter.com/kav7fh5VF4
— Vicky Foji Bhai:- ??\?????? (@foji_vicky) November 21, 2022
नवले ब्रीज अपघात, आतापर्यंत काय काय?
- रविवारी रात्री आठ ते सव्वा आठ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.
- पुण्यातील मुंबई- बंगळुरू हायवेवर नवले ब्रीजवर ही घटना घडली.
- आंध्र प्रदेशची पासिंग असलेला ट्रक रविरात्री साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जात होता.
- नवले ब्रीज परिसरात दरी पूल ओलांडल्यानंतर ट्रकचं नियंत्रण सुटलं. ब्रीजच्या उतारावरून एकानंतर एक असंख्य वाहनांना धडका देत ट्रक पुढे निघाला.
- या घटनेत जवळपास 48 वाहनांना मोठं नुकसान झालं तर 10 जण जखमी झाले.
- घटना घडताच काही वेळातच अपघात स्थळी बचावकार्य सुरु झाले.
- ट्रॅफिक जाम असल्यामुळे अनेक वाहने एकमेकांना खेटून उभी होती. यामुळे अनेक वाहनांमध्ये लोक आणि चालक अडकून पडले.
- अग्निशमन दलाच्या जवानांसमोर अपघातग्रस्त वाहनांतून चालकांना बाहेर काढण्याचं आव्हान होतं.
- सोमवारी सकाळपर्यंत अपघातग्रस्त वाहनांना बाजूला सारण्याचं काम सुरु होतं.
- सध्या नवले ब्रीजवरील ही वाहनं बाजूला काढण्यात आली असून आता हा ब्रीज वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात आला आहे.
- जखमींवर उपचार सुरु आहेत. हा अपघात नेमका का झाला, यासंबंधी महत्त्वाची बैठक नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियातर्फे आज सोमवारी बोलावण्यात आली आहे.