Pune Accident | पुणे संतोष माने अपघात प्रकरणाची पुनरावृत्ती, मद्यधुंद वाहन चालकाने अनेक वाहनांना उडवले
Pune Accident News | पुणे शहरात शुक्रवारी रात्री संतोष माने अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या. त्या अपघाताची पुनरावृत्ती झाल्यामुळे थरकाप उडाला. एका मद्यधुंद वाहन चालकाने एकामागे एक अनेक वाहनांना उडवले.
अभिजित पोते, पुणे | 7 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहरवासींना शुक्रवारी रात्री 2012 मध्ये घडलेल्या संतोष माने प्रकरणाची आठवण आली. एका मद्यधुंद वाहन चालकाने एकामागे एक अनेक वाहनांना उडवले. रस्त्यावरुन चालणाऱ्या पदचाऱ्यांना धडक दिली. यामुळे पुण्यातील प्रसिद्ध झेड ब्रिजजवळ थरकाप उडाला. नारायण पेठ पोलीस चौकीकडून चार चाकी वाहन झेड ब्रिजकडे जात होते. त्यावेळी हा अपघात घडला. दरम्यान, मद्यपान केलेल्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कसा घडला अपघात
पुणे येथील उमेश हनुमंत वाघमारे (वय 48) आणि नटराज बाबुराव सूर्यवंशी (वय 44) हे दोघे शुक्रवारी रात्री चार चाकी वाहनाने नारायण पेठ पोलीस चौककडून झेड ब्रिजकडे जात होते. दोघांनी मद्य प्राशन केले होते. त्यातील उमेश वाघमारे गाडी चालवत होता. भरधाव वेगाने गाडी चालवत त्याने रस्त्यावरील वाहनांना धडक देणे सुरु केले. त्याचवेळी रस्त्याने जाणाऱ्या पदचाऱ्यांनाही धडक दिली. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तसेच चार जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तीन ते चार वाहनांना उडवले
हिट अँड रन प्रकरणासारख्या या अपघातात भरधाव वेगाने जणाऱ्या वाहनाने 3-4 वाहनांना उडवले. त्यात दोन रिक्षांचा समावेश आहे. तसेच पादचाऱ्यांना धडक दिली. वाहन चालकाने धडक दिल्यामुळे एका 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. तसेच रिक्षा चालक इतर काही जखमी झाले. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
संतोष माने प्रकरणाची आठवण
पुणे शहरात 2012 मध्ये संतोष माने याने केलेल्या अपघात प्रकरणाची आठवण ताजी झाली. 25 जानेवारी 2012 मध्ये संतोष माने स्वारगेट स्थानकातून पीएमटीची बस काढली. वेगाने ही बस नेत रस्त्याने जाणाऱ्या अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला होता तर 37 जण जखमी झाले होते. संतोष माने हा पीएमटीत ड्रायव्हर होता. या प्रकरणात त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. पुण्यातील या अपघाताची चर्चा देशभरात झाली होती.