Pune News | पुणे, मुंबई प्रवाशांची गर्दीची समस्या सुटणार, काय आहे योजना
Pune News | पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या नियमित प्रवाशांना गर्दीच्या समस्येला समोरे जावे लागते. यामुळे अनेकांना हा प्रवास उभा राहून करावा लागतो. परंतु ही समस्या सोडवण्यासाठी पाऊल उचलले गेले आहे. आता हा प्रवास आरामदायी होणार आहे.
पुणे | 16 सप्टेंबर 2023 : पुणे आणि मुंबई प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दररोज हजारो जण पुणे-मुंबई प्रवास करतात. यामुळे पुण्यावरुन मुंबईला जाणाऱ्या रेल्वेमध्ये नेहमी गर्दी असते. तसेच पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर वाहतुकीची कोंडी होत असते. ही कोंडीची समस्या सोडवण्यासाठी हा महामार्ग आठ पदरी करण्यात येणार आहे. त्याचवेळी रेल्वेनेही गर्दीची समस्या सोडवण्यासाठी पाऊल उचलले आहे. यामुळे पुण्यातील गर्दी कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
काय उपाययोजना करणार पुणे रेल्वे
पुणे-मुंबई दरम्यान होणारी गर्दीची समस्या सोडवण्यासाठी पुणे रेल्वेकडून पुढाकार घेतला आहे. पुणे रेल्वे स्थानकावर असणाऱ्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे रेल्वेने हे काम सुरु केले आहे. पुणे रेल्वे स्थानकावरील ३० टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकावर आता २४ ऐवजी २६ डब्यांच्या गाड्या उभ्या राहणार आहेत. पुणे रेल्वे स्थानकावरुन सुटणाऱ्या गाड्यांचे डबे वाढवले जाणार आहे. यामुळे गर्दीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.
कोणत्या प्लॅटफॉर्मची वाढणार लांबी
पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोन, तीन आणि सहाची लांबी वाढवण्याचे काम सुरु झाले आहे. सध्या प्लॅटफॉर्मवर फक्त १६ ते १८ डब्यांच्याच रेल्वेगाड्या उभ्या राहू शकतात. लांबी वाढल्यानंतर २६ डब्यांच्या गाड्या या ठिकाणी उभ्या राहू शकतील. तसेच पुणे रेल्वेने हडपसरमध्ये नवे टर्मिनल उभारण्याचे काम सुरु केले आहे. या सर्व कामांसाठी ५१ कोटी रूपयांचा खर्च येणार आहे.
लोकलसाठी नवीन टर्मिनल
पुणे रेल्वे स्थानकाजवळ असणाऱ्या संगम पूलजवळ लोकलसाठी नवीन टर्मिनल उभारण्यात येणार आहे. मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनकडून यासाठी जागा निश्चित केली गेली आहे. या निर्णयामुळे पुणे-लोणावळ दरम्यान सुटणाऱ्या लोकालची संख्या वाढणार आहे. तसेच पुणे-लोणावळा दरम्यान तिसरी आणि चौथी रेल्वे लाईन टाकण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. यामुळे पुणे-मुंबई दरम्यान रेल्वेची संख्या वाढणार आहे. या सर्वांचा परिणाम पुणे-मुंबई प्रवाशाची गर्दी कमी होणार आहे.