पक्ष हातून गेल्यावर शरद पवारांनी जुनी खेळी खेळली; ‘गोविंदबाग’मध्ये नेमकं काय घडतंय?
Sharad Pawar Baramati Home Govindbaug : पक्ष हातून गेल्यावर शरद पवार अॅक्शनमोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंदबाग निवासस्थानी हालचाली वाढल्या आहेत. बारामतीत नेमकं काय घडतंय? शरद पवार यांची रणनिती काय? वाचा सविस्तर...
योगेश बोरसे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, बारामती- पुणे | 18 फेब्रुवारी 2024 : कितीही विरोधी परिस्थिती असली तर त्यातून मार्ग काढून आपला दबदबा कायम ठेवणारे नेते म्हणून शरद पवार यांची देशात ओळख आहे. आता सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राष्ट्रवादी पक्षात फूट पडली आहे. अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीत दादांचे समर्थक आणि साहेब समर्थक असे दोन गट पडले. अशातच केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला दिलं. त्यानंतर आता शरद पवार यांची पुढची राजकीय भूमिका काय असेल याबाबत सर्वत्र चर्चा होतेय. असं असतानाच शरद पवार त्यांची जुनी खेळी खेळताना दिसत आहेत.
शरद पवारांची ‘ती’ रणनिती
लोकांशी संपर्क करणं, भेटीगाठी घेणं आणि त्यांच्याशी संवाद साधणं ही शरद पवार यांची जुनी राजकीय निती आहे. लोकांचा पाठिंबा हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे. असं शरद पवार म्हणतात. आता पक्ष हातून गेल्यानंतर हीच रणनिती शरद पवार पुन्हा एकदा आखताना दिसत आहेत. पक्ष हातून गेल्यानंतर शरद पवार पहिल्यांदा बारामतीत आहेत. अशात ते जुन्या सहकाऱ्यांच्या भेटी घेत आहेत.
कुणी घेतली पवारांची भेट?
शरद पवारांकडून आता राष्ट्रवादीपासून दुरावलेल्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. इंदापूरच्या जाचक पिता-पुत्रांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. राज्य साखर संघाचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी गोविंदबागेत शरद पवारांची भेट घेतली. यावेळी पृथ्वीराज जाचक यांचे पुत्र कुणाल जाचकही उपस्थित होते. या भेटीमुळे इंदापूर तालुक्यात नवीन राजकीय समीकरणे उदयाला येण्याची चिन्हे आहेत. शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेरजेचं राजकारण करण्यास सुरुवात केल्याचं दिसत आहे.
गोविंद बागेत हालचाली वाढल्या
पक्ष आणि घड्याळ चिन्ह हातून गेल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच बारामतीत आले आहेत. कालपासून गोविंद बाग या त्यांच्या निवासस्थानी हालचाली वाढल्या आहेत. सकाळपासून पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्ते गर्दी करत आहेत. शरद पवारांच्या उपस्थितीत काही पक्ष प्रवेश होत आहेत. माळशिरस मधील काही कार्यकर्ते शरदचंद्र पवार गटात काल प्रवेश केला.