Dengue vaccine | देशात प्रथमच ही लस तयार करण्याचे काम, आता लवकरच मिळणार भारताला स्वत:ची लस
Dengue vaccine | कोरोना काळात पुणे शहर देशाचे केंद्र ठरले होते. त्यावेळी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये कोरोना लस तयार करण्याचे काम झाले. आता आणखी एका आजारापासून भारतीयांची सुटका होणार आहे. त्यासंदर्भातील लसीवर संशोधन सुरु होत आहे.
पुणे | 19 सप्टेंबर 2023 : पुणे शहर हे संशोधनाचे केंद्र आहे. संरक्षण क्षेत्रापासून आरोग्यापर्यंत अनेक प्रकारचे संशोधन पुणे शहरात होत असते. आता पुणे शहरात एका आजारावरील लसीवर संशोधनाचे काम सुरु होणार आहे. त्यानंतर देशात प्रथमच त्या आजारावरील लस मिळणार आहे. कोरोनानंतर या आजारावर होणाऱ्या संशोधनाकडे देशाचे लक्ष लागले आहे. पुणे येथील नॉलेज कस्टर आणि बी.जे.मेडीकल कॉलेज यांच्या माध्यमातून या जीवघेण्या आजारावर लस तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. यामुळे लवकरच देशाला पुण्यातून चांगली बातमी मिळणार आहे.
कोणत्या आजारावर सुरु आहे संशोधन
घराघरात नेहमी येणाऱ्या जीवघेण्या डेंग्यू या आजारवर लस निर्मिती करण्याची जबाबदारी पुणे शहराने घेतली आहे. देशात प्रथमच डेंग्यू या आजारावर लस तयार केली जात आहे. पुणे येथील नॉलेज कस्टर (पीकेसी) आणि बी.जे.मेडीकल कॉलेज महिन्याभरात या लशीवर संशोधन करणार आहे. त्यानंतर यासंदर्भातील डाटा केंद्र सरकारला देण्यात येणार आहे.
यांच्यासोबत झाला करार
बी.जे.मेडीकल कॉलेजचे सुक्ष्मजीव शास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर राजेश कार्यकर्ते हे पीकेसीसोबत यावर संशोधन करत आहे. डॉक्टर कार्यकर्ते यांनी यापूर्वी कोव्हीडचे वेगवेगळे व्हेरियंट शोधले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रभावी ठरलेल्या डेल्टाचा व्हेरियंट पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेजने शोधला होता. त्यामुळे डेंग्यूवरील लसही लवकरच मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Dengue vaccine
…तर सुरु होणार लसीचे उत्पादन
डेंग्यूच्या लसीसाठी रॉकफेअर फाऊंडेशनने पीकेसीला निधी दिला आहे. त्यानंतर बीजे मेडिकल कॉलेज संशोधकाची भूमिका निभावत आहे. हे संशोधन यशस्वी झाल्यास देशातील कंपन्या डेंग्यूच्या आजारावरील लसींचे उत्पादन सुरु करतील. आतापर्यंत भारतात डेंग्यू आजारावर लस तयार झालेली नाही. परदेशात ही लस आहे, परंतु ती भारतीयांना अनुकूल नाही. सध्या ही लस अमेरिका, ऑस्ट्रेलियाकडे आहे. परंतु या लसींचे जीनोम्स वेगळे असल्यामुळे ती आपल्याकडे चालत नाही. त्यामुळे आता भारतीय लसची निर्मिती हाच एकमेव उपाय आहे.