पुणे शहरातील चांदणी चौक परिसरात दारूच्या, बिअरच्या बॉटल लटकावून आंदोलन, काय आहे प्रकार
Pune News : पुण्यात चांदणी चौक पुलाचे आज नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत उद्घाटन होत आहे. त्याचवेळी या परिसरात दारु अन् बियरच्या बाटल्या लावून आंदोलन सुरु केले आहे. काय आहे आंदोलन करणाऱ्यांची मागणी...
प्रदीप कापसे, पुणे | 12 ऑगस्ट 2023 : पुणे शहरातील वाहतूक कोंडी असणाऱ्या चांदणी चौक परिसरातील प्रश्न आज सुटणार आहे. चांदणी चौक उडड्णपुलाचे लोकर्पण शनिवारी होणार आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी या पुलाचे उद्घाटन करणार आहेत. त्याचवेळी या परिसरात एक अनोखे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनामुळे लक्ष वेधले गेले आहे. दारूच्या, बिअरच्या बॉटल लावून हे आंदोलन केले जात आहे. चेंज इंडिया फाऊंडेशनकडून हे आंदोलन केले जात आहे.
काय आहे मागणी
पुणे येथील चांदणी चौक परिसरात दारूच्या, बिअरच्या बॉटल लटकावून आंदोलन सुरु आहे. प्रतिकात्मक सह्यांची मोहिमही घेतली जात आहे. चेंज इंडिया फाऊंडेशनकडून हे आंदोलन केले जात आहे. चांदणी चौकाला एनडीए ब्रिज नाव द्या, अशी मागणी आंदोलन कर्त्यांनी केली आहे. बदनाम असणाऱ्या चांदणी ऐवजी एनडीए ब्रिज म्हणा, अशी मागणी केली आहे.
एनडीए ब्रिज नाव हवे
चांदणी चौक यामधील चांदणी हा शब्द बदनाम आहे. त्याला कोणताही इतिहास नाही. प्रेरणा नाही. परंतु पुणे शहरात इतिहास आणि गौरवशाली परंपराला लाभलेली राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे एनडीए आहे. देशात दोन ठिकाणी अशी संस्था आहे. त्यात पुणे शहरात एनडीए आहे. या संस्थेला एक मोठी परंपरा आणि गौरवशाली इतिहास आहे. यामुळे या पुलास एनडीए ब्रीज नाव देण्याची मागणी चेंज इंडिया फाऊंडेशनकडून केली आहे. त्यासाठी फाऊंडेशनचे सचिन धनकुडे यांनी प्रतिकात्मक आंदोलन सुरु केले आहे.
दारूच्या, बिअरच्या बॉटल लावल्या
सचिन धनकुडे यांनी दारूच्या, बिअरच्या बॉटल लावून चांदणी चौक परिसरात आंदोलन सुरु केले आहे. यावेळी नागरिकांच्या सह्या घेतल्या जात आहे. ब्रिजला एनडीए ब्रिज नावं द्या आणि नवीन पुलाप्रमाणे नवीन परंपरेला सुरुवात करा, अशी मागणी सचिन धनकुडे यांनी केली आहे. त्यांच्या या आंदोलनास नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. नवीन पुलाची नवीन परंपरा सुरु करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.