Chandani chowk : पुण्याच्या चांदणी चौकातला पूल पाडण्याची तयारी पूर्ण, राडारोडा रविवारपर्यंत हटवणार
पूल पाडल्याने येथील वाहतूककोंडी कमी होणार असली तरी इतर ठिकाणी ती शिफ्ट होईल. त्यामुळे मूळ प्रश्न कायम राहणार आहे. प्रशासनाने यावर कायमस्वरुपी तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.
पुणे : चांदणी चौक (Chandani chowk) पूल पाडकामास आज (गुरुवारी) सुरुवात होणार आहे, असे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (National Highways Authority of India) अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. काल म्हणजेच बुधवारी एडिफिस इंजिनीअरिंगच्या तज्ज्ञांच्या पथकाने या परिसराची तसेच संबंधित पुलाची पाहणी केली. एडिफिस टीम यावर काम करत आहे यात झालेल्या कामाच्या प्रगतीचा दैनंदिन अहवाल ते देतील आणि त्यानंतर पूल पाडण्याच्य कामाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे. त्यांनी अद्याप त्यांचा अंतिम अहवाल आम्हाला सादर केलेला नाही. या अहवालाच्या आधारे आम्ही पाडण्याची नेमकी तारीख आणि वेळ याबद्दल बोलू शकतो. पोलिसांशीदेखील (Police) समन्वय सुरू आहे, असे एनएचएआयचे पुणे प्रकल्प संचालक संजय कदम म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एनएचएआय आणि संबंधित यंत्रणांना 12 ते 15 सप्टेंबर दरम्यान येथील पूल पाडण्याचे आणि त्यानंतर या मार्गावर सुरळीत वाहनांच्या वाहतुकीसाठी अतिरिक्त लेन टाकण्यास सांगितले होते.
10 सप्टेंबरपर्यंत होणार पाडकाम
10 सप्टेंबरच्या रात्री उशिरापर्यंत पाडकाम पूर्ण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यामुळे आम्हाला रविवारी ढिगारा हटवता येईल. कारण आठवड्याच्या दिवसांच्या तुलनेत रविवारी सामान्यत: कमी रहदारी असते. 4-6 तासांत पूर्णपणे काम संपवले जाईल आणि हा परिसर पुन्हा वाहतुकीसाठी खुला केला जाऊ शकतो. अतिरिक्त लेन टाकण्यास सुमारे 15 दिवस लागतील, असे एनएचएआयच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.
कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी
वाहतूककोंडी कमी करण्यासाठी येथील पूल पाडला जाणार आहे. मात्र हा अल्पकालीन उपाय असल्याचे वाहतूकतज्ज्ञांचे मत आहे. पूल पाडल्याने येथील वाहतूककोंडी कमी होणार असली तरी इतर ठिकाणी ती शिफ्ट होईल. त्यामुळे मूळ प्रश्न कायम राहणार आहे. प्रशासनाने यावर कायमस्वरुपी तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.
मुख्यमंत्र्यांनी केली होती सूचना
स्वत: मुख्यमंत्री सातारा याठिकाणी जात असताना चांदणी चौकात झालेल्या कोंडीत अडकले होते. त्यानंतर स्थानिकांनीही त्यांना निवेदन दिले होते. याप्रकरणी वाहतूककोंडी कमी करण्यासाठी पूल पाडण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला केल्या होत्या. तसेच कोंडी सोडवण्यासाठी आणखी काय उपाययोजना करता येतील, या हेतूने परिसराची पाहणीही केली होती.