Pune News : महागडी घरे घेण्यात पुणेकरांची आघाडी, कोटींची घरे किती लोकांनी घेतली?
Pune Home Selling : पुणे शहरात लोकांची कल आता महागड्या घरांच्या खरेदीकडे वाढू लागला आहे. यामुळे गेल्या काही वर्षांपासून एक कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या घरांना मागणी वाढली आहे. यासंदर्भात क्रेडाईचा अहवाल आलाय...
पुणे | 10 सप्टेंबर 2023 : प्रत्येकाला आपले हक्काचे घर हवे असते. त्यासाठी तो आयुष्यभराची पुंजी जमा करतो आणि हक्काचे घर घेतो. कधीकाळी घर घेण्यासाठी अशीच परिस्थिती होती. परंतु पुणेकर आता बदलू लागले आहे. पुणे शहरात आलेले उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमुळे पुणेकरांचे उत्पन्न वाढले आहे. आता पुणेकरांची पसंती महागडी घरे ठरत आहे. यामुळे निवृत्तीनंतर 1BHK घेणाऱ्यांचा काळा आता गेला आहे. आता नोकरी लागताच 3BHK मध्ये राहणारे युवा पिढी समोर आली आहे. यामुळे पुणे शहरात कोटींची घरे घेण्याचे प्रमाण वाढले आहे.
किती वाढले प्रमाण
कधीकाळी कोटींची घर घेणाऱ्यांची संख्या पुणे शहरात कमी होती. परंतु आता ‘क्रेडाई’ने केलेल्या अहवालातून मिळालेली माहिती आश्चर्यकारक आहे. पुणे शहरात एक कोटीपेक्षा जास्त किंमत असलेल्या घरांची मागणी वाढली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत या घरांची विक्री वाढली आहे. मागील पाच वर्षांच्या तुलनेत म्हणजेच २०१९ नंतर आता २०२३ मधील पहिल्या सहामाहीत हे प्रमाण २५० टक्के वाढले आहे.
किती फ्लॅटची झाली विक्री
जानेवारी ते जून २०२३ दरम्यानचा अहवाल क्रेडाईने दिला आहे. त्यानुसार पुणे शहरात एक कोटी रुपये किंमत असलेल्या पाच हजार ४११ फ्लॅटची विक्री या दरम्यान झाली आहे. एक कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या फ्लॅटचे एकूण मूल्य आठ हजार १६२ कोटी रुपयांवर गेले आहे. सन २०२२ मध्ये जानेवारी ते जून दरम्यान चार हजार घरांची विक्री झाली होती. त्यातून सहा हजार ३२१ कोटी रुपयांची उलाढाल झाली होती.
का वाढली महागड्या घरांना मागणी
पुणे शहरातील नागरिकांचे उत्पन्न वाढले आहे. शहरात उद्योग आणि रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे नोकरी करणाऱ्यांचे पॅकेज वाढले आहे. त्यामुळे महागडी घरे घेण्याकडे पुणेकर प्राधान्य देत आहेत. पुणे शहरातील बिल्डर नागरिकांचा महागड्या घरांकडे कल पाहून त्यापद्धतीने फ्लॅट तयार करत आहे.