Pune News : पुणेकरांनो CNG भरुन घ्या, पंपचालकांनी घेतला विक्री थांबवण्याचा निर्णय
Pune News : पुणे शहर हे सर्वाधिक गाड्या असणारे शहर आहेत. अनेक गाड्यांचे मॉडेल पुणेकरांसाठी आहे. पेट्रोल, डिझेलप्रमाणे सीएनजीच्याही गाड्या आहेत. परंतु सीएनजी गाड्या असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.
अभिजित पोते, पुणे | 3 ऑगस्ट 2023 : पुणे शहराचा विस्तार मोठा झाला आहे. परंतु पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अजूनही चांगली झालेली नाही. यामुळे अनेक जण आपल्या वैयक्तीक वाहनांचा वापर करतात. यामुळेच पुणे शहरात राज्यातील सर्वाधिक वाहनसंख्या आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी, सीएनजी अन् इलेक्ट्रीक वाहने मोठ्या प्रमाणावर पुण्यात आहेत. परंतु आता सीएनजी वाहन चालकांसाठी महत्वाची बातमी आहे. पुणे शहरातील सीएनजीची विक्री बंद असणार आहे. यामुळे आताच सीएनजी भरुन घ्यावे लागणार आहे.
का असणार विक्री बंद
पुणे शहरातील पंप चालकांनी 10 ऑगस्टपासून टोरेंट सीएनजी पंपांवर CNGची विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील विक्रेत्यांना ट्रेड मार्जिनची मोठी थकबाकी आहे. ही थकबाकी सुमारे ७ कोटी रुपयांपर्यंत गेली आहे. यामुळे पंपचालकांनी सीएनजी विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे येथील पेट्रोल डीलर्स अससोसिएशन तेल कंपन्या आणि टोरेंट गॅस यांना अनेक वेळा पत्र व्यवहार करून सुद्धा थकबाकी मिळाली नाही. यामुळे बंदचे हत्यार असोसिएशनने बाहेर काढले आहे.
किती विक्रेत आहेत
पुणे जिल्ह्यातील सीएनजी विक्री करणारे एकूण 42 विक्रेते आहेत. त्यांनी १० ऑगस्टपासून विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या खात्यात ट्रेड मार्जिनची रक्कम रिफ्लेक्ट होईपर्यंत CNG ची विक्री थांबविण्याचा पुणे जिल्हा असोसिएशनने घेतला आहे. यामुळे १० ऑगस्टनंतर पंपावर सीएनजी मिळणार नाही.
सीएनजी कार का वापरतात
पेट्रोलला पर्याय म्हणून सीएनजी कार आल्या आहेत. या कारमुळे पेट्रोलपेक्षा कमी दरात प्रवास करता येतो. तसेच प्रदूषण होत नाही. सीएनजी कारमुळे मायलेज जास्त मिळते. त्याचा देखभाल दुरुस्ती खर्चही कमी आहे. यामुळे सीएनजी गाड्यांना चांगली मागणी आहे. अगदी सात लाखांपासून सीएनजी गाड्या उपलब्ध आहेत. अनेकांनी या सर्व गोष्टींचा लाभ मिळवण्यासाठी सीएनजी गाड्या घेतल्या. परंतु पुणेकरांसाठी काही पर्याय न निघाल्यास १० ऑगस्टपासून सीएनजी मिळणार नाही.