Pune CNG : सीएनजीचे दर वाढले, आता भाडेवाढही करा; पुण्यात ऑटोरिक्षा युनियन आक्रमक
राज्य सरकारने नैसर्गिक वायूवरील व्हॅट 13 टक्क्यांवरून कमी करण्याची घोषणा केली होती. 1 एप्रिलपासून पुणे शहरातील सीएनजी गॅसचे सुधारित दर 62 प्रति किलोपर्यंत खाली आले होते. आता एका गॅसच्या आंतरराष्ट्रीय दरांमध्ये तीन वेगवेगळ्या वाढीमुळे, पुणे शहरात दर प्रति किलो 80 रुपयांवर गेले आहेत.
पुणे : पुणे शहरातील ऑटोरिक्षा युनियन (Autorickshaw Union) पुन्हा एकदा भाडेवाढीची मागणी करत आहे. कारण सीएनजीचे दर प्रचंड वाढले आहेत. पुण्यात सीएनजी आता 80 रुपये प्रति किलो झाले आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार 90 टक्के रिक्षा सीएनजीवर (CNG rickshaw) चालतात. ऑटोरिक्षा युनियनने सोमवारी झालेल्या बैठकीत भाडेवाढीची मागणी केली आणि ती राज्य परिवहन विभागाला कळवण्यात आली आहे. पुण्यातील ऑटोचे सध्याचे मूळ भाडे पहिल्या 1.5 किमीसाठी 20 रुपये आणि त्यानंतर प्रत्येक किलोमीटरसाठी 13 रुपये आहे. हे नवीन दर 8 नोव्हेंबर 2021पासून लागू झाले आहेत. इंधनाची दरवाढ (Fuel price hike) ही डोकेदुखी ठरत आहे. पुण्यातील अनेक रिक्षा सीएनजीवर चालतात. आता सीएनजीच्या दरात वाढ झाल्यामुळे भाडेवाढीशिवाय पर्याय नाही, अशी भूमिका ऑटोरिक्षा युनियनने मांडली आहे.
‘भाडे परवडण्यासारखे नाही’
रिक्षा पंचायतीचे निमंत्रक नितीन पवार म्हणाले, की सीएनजीच्या वाढत्या किंमतीच्या तुलनेत पुण्यातील ऑटोचे भाडे कमी आहे. बहुतेक वाहने CNGवर चालतात. कारण हा एक परवडणारा पर्याय आहे. परंतु वाढत्या किमतींमुळे आर्थिकदृष्ट्या टिकून राहणे आणि प्रवाशांना फेरीसाठी समान दर आकारणे कठीण आहे. त्यापार्श्वभूमीवर आता आकारत असलेले भाडे परवडण्यासारखे नाही. त्यामुळे आम्ही भाडे वाढवण्याची मागणी करत आहोत. दरम्यान, सीएनजीच्या दरातही सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्य आणि सीएनजी वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
व्हॅट कमी केला, मात्र…
राज्य सरकारने नैसर्गिक वायूवरील व्हॅट 13 टक्क्यांवरून कमी करण्याची घोषणा केली होती. 1 एप्रिलपासून पुणे शहरातील सीएनजी गॅसचे सुधारित दर 62 प्रति किलोपर्यंत खाली आले होते. आता एका गॅसच्या आंतरराष्ट्रीय दरांमध्ये तीन वेगवेगळ्या वाढीमुळे, पुणे शहरात दर प्रति किलो 80 रुपयांवर गेले आहेत. त्यामुळे भाडेवाढ आवश्यक आहे, असे युनियनचे म्हणणे आहे. दरम्यान, सीएनजीच्या दरात वाढ झाल्यामुळे भाडेवाढीची मागणी होत आहे. ही भाडेवाढ झाल्यास त्याचा परिणाम थेट ग्राहकांवर पडणार आहे. आधीच महागाईमुळे त्रस्त असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना रिक्षाच्या भाडेवाढीचा फटका सहन करावा लागणार आहे.