पुणे महानगरपालिकेकडे इंजेक्शनच्या फक्त 30 हजार सिरींज शिल्लक, कोरोना लसीकरणाला ब्रेक लागण्याची शक्यता
Covid Vaccine | सध्याच्या घडीला पुणे महानगरपालिकेकडे इंजेक्शनच्या केवळ 30 हजार सिरींज उपलब्ध आहेत. त्यामुळे आता आठवड्यातून केवळ तीन दिवसच लसीकरण करण्यात येणार आहे.
पुणे: गेल्या काही दिवसांत पुण्यातील कोरोना लसीकरण मोहीम वेगाने पुढे नेण्यात अडथळे येताना दिसत आहेत. कोरोनाची लस देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शन्सच्या सुयांच्या (सिरींज) तुटवड्यामुळे सध्या पुणे महानगरपालिकेसमोर समस्या उभी राहिली आहे. सध्याच्या घडीला पुणे महानगरपालिकेकडे इंजेक्शनच्या केवळ 30 हजार सिरींज उपलब्ध आहेत. त्यामुळे आता आठवड्यातून केवळ तीन दिवसच लसीकरण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पुणे महानगरपालिकेने तीन दिवसांपूर्वीच एक लाख सिरींज खरेदी केल्या होत्या. मात्र, हा साठाही संपत आल्याने पुण्यातील लसीकरण मोहीमेला ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महापालिकेकडे 1.50 रुपयांची सिरींज नसणं दुर्दैव
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात या मुद्द्यावरुन राजकारण रंगले आहे. कोरोना लसीकरण सिरींज अभावी रखडल्याचा प्रकार पुण्यात घडल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी कोरोना लसी उपलब्ध होऊन केवळ सिरींज अभावी लसीकरण रखडणं ही पालिकेचा भोंगळ कारभार दाखवणारी घटना आहे, असं म्हटलंय. राज्यातील मोठ्या महानगरपालिकांपैकी एक महापालिका असणाऱ्या अ दर्जाच्या पुणे महापालिकेकडे 1.50 रुपयांची सिरींज नसावी यापेक्षा दुर्दैव काय असावं ?, अशी टीका प्रशांत जगताप यांनी केली होती.
पुणे अ दर्जाची महापालिका, जिचं बजेट 8 हजार कोटी आहे. भौगोलिकदृष्ट्या महापालिका मोठी आहे, आज तिच्याकडे सिरींज नसावी. त्या अभावी लसीकरण बंद पडणं निश्चित पुण्यातील सत्ताधाऱ्यांना शोभणारं नाही. पालिकेत सत्ताधारी असणाऱ्या महापौर, चेअरमन, आणि सभागृह नेत्यांना याची कल्पना नव्हती का ?, असा सवालही जगताप यांनी उपस्थित केला होता.
पिंपरी-चिंचवडमधील 47 केंद्रांवर लसीकरण
पिंपरी चिंचवड शहरात कोरोना प्रतिबंधक ‘कोविशिल्ड’ लसीचे 19 हजार व ‘कोव्हॅक्सिन’ लसीचे 3 हजार दोनशे असे एकूण 22 हजार 200 डोस महापालिकेकडे उपलब्ध आहेत. शहरातील 18 वर्षांपुढील नागरिकांना आज ‘कोविशिल्ड’, ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येईल. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप, ऑनलाइन स्लॉट बुकिंग पद्धतीने आणि किऑस्कद्वारे टोकन घेतलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण होणार आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये 99 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी दिवसभरात 99 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर 81 कोरोनामुक्तांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आजपर्यंत शहरातील 4 हजार 442 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील 2 लाख 74 हजार 91 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. सध्या शहरात 873 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 481 रुग्ण गृहविलगीकरणात असून 392 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.