Pune Ganpati Visarjan | पुणे गणेश विसर्जन मिरवणुकीत इतिहास घडला, विक्रमी वेळेत या गणरायाचे विसर्जन
Pune Shrimant Dagdusheth Halwai Ganesh Visarjan | पुणे गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदा इतिहास घडला. पुणे शहरातील आकर्षणाचे केंद्र असलेल्या गणेश मंडळाचे विसर्जन विक्रमी वेळेत झाले. हे विसर्जन पाहण्यासाठी भाविकांचा जनसागर लोटला होता.
पुणे | 29 सप्टेंबर 2023 : गणपती बाप्पा मोरया…च्या जयघोषात पुणे गणेश विसर्जन मिरवणुकीत अनेक गणरायाचे विसर्जन झाले. विसर्जन मिरवणुकीत मानाचे पाचही गणपती अग्रभागी होते. त्यांचे विसर्जन गुरुवारी दुपारीच झाले. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदाही भव्य दिव्य देखावे साकरण्यात आले होते. गणेश भक्तांनी विसर्जन मिरवणुकीतील देखावे पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. पुणे शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदा विक्रम घडला.
दगडूशेठ गणपती मंडळाचा विक्रम
गणपती बाप्पा मोरया… च्या गजरात पुणे शहरातील दगडूशेठ गणपती मंडळाकडून यंदा इतिहास घडला. या मंडळाची विसर्जन मिरवणूक विक्रमी वेळेत पूर्ण झाली. मंडळाचे गणेश विसर्जन 14 तासांपूर्वीच झाले. प्रथमच इतक्या लवकर गणेश मंडळाचे विसर्जन झाले. यंदा मिरवणुकीला दुपारी 4 वाजताच सुरुवात झाली होती. श्री गणाधीश रथातून दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक काढण्यात आली. रथावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. बेलबाग चौकातून लक्ष्मी रस्त्यावर रथ आला तेव्हा मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांचा जनसागर लोटला.
मंडळाने दिला होता शब्द
दगडूशेठ हलवाई गणेश मंडळाने यंदा विसर्जन वेळेत करण्याचा शब्द दिला होता. दरवर्षी दगडूशेठ गणेश मंडळ मध्यरात्री लक्ष्मी रस्त्यावर असलेल्या मिरवणुकीत सहभागी होते. मात्र, यंदा प्रथमच दुपारी चार वाजताच मिरवणुकीचा रथ लक्ष्मी रस्त्यावर. विसर्जन वेळेत करण्यासाठी दुपारी चार वाजताच मिरवणुकीत सहभागी होणार असल्याची घोषणा मंडळाने यापूर्वीच केली होती. त्यानुसार दुपारी चार वाजताच मंडळाचा रथ लक्ष्मी रस्त्यावर आला आणि रात्री 8.50 वाजता पांचाळेश्वर मंदिर घाट येथे मंडळाच्या गणरायाचे विसर्जन झाले.
भाविकांचा जनसागर लोटला
दगडूशेठ गणेश मंडळाच्या प्रभात, दरबार ही बँडपथके सहभागी झाले होते. ढोल-लेझीम पथक, सनई-चौघडांची साथ मिरवणूक होती. 21 फूट सुंदर आणि आकर्षक रथातून गणपती बाप्पाची मिरवणूक निघाली. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी भाविकांकडून बाप्पाचे स्वागत करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडळाने सामाजिक विषयांतर्गत आरोग्यविषयक जनजागृती रथावर केली होती. ही मिरवणूक पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती.