Deenanath Mangeshkar Hospital : ‘आता 3 लाख घ्या, पुढच्या चार ते पाच तासात…’, हॉस्पिटलची क्रूरता, रुपाली चाकणकरांकडून धक्कादायक खुलासा
Deenanath Mangeshkar Hospital : "पेशंटला डॉक्टरांनी 2 तारखेला बोलावलं होतं. पण हेवी ब्लिडिंग होतय म्हणून पेशंट 28 तारखेला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेला. 9 वाजून 1 मिनिटांची एन्ट्री दिसत आहे. पेशंटचा डॉक्टरांशी संपर्क झाल्यानंतर त्यांनी संबंधित स्टाफला सूचना दिली"

पैसे नसतील, तर खासगी रुग्णालयात कशी वागणूक मिळते ते पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या रुपाने समोर आलं आहे. तनिषा सुशांत भिसे या गर्भवती महिलेला उपचाराची गरज होती. त्यावेळी फक्त पैशांच्या मुद्यावरुन उपचार नाकारण्यात आले. त्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला. आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी भिसे कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक गोष्टी समोर आणल्या आहेत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने कशा प्रकारे नियमांच उल्लंघन केलं, ते त्यांनी सांगितलं. “कोणताही पेशंट चांगल्या उपचारांसाठी आपल्या आयुष्यातील व्यक्तीगत गोष्टी डॉक्टरांशी शेअर करतो. तनिषा यांची डॉ. घैसास यांच्याकडे ट्रीटमेंट सुरु होती. 15 मार्च रोजी पेशंट पहिल्यांदा डॉक्टरला भेटला. त्यावेळी याआधी ट्रीटमेंट कशी घेतली? सर्व मेडिकल हिस्ट्री सांगितली”
“पेशंटची मेडिकल हिस्ट्री डॉक्टरला माहित होती. ही घटना घडल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने एक समिती नेमली. त्या समितीने स्वत:ला वाचवण्यासाठी रुग्णाची व्यक्तीगत माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडली. याचा मी निषेध करते, कुटुंबाने यावर आक्षेप घेतलाय” असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.
ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्याआधी 10 लाखाची मागणी
“पेशंटला डॉक्टरांनी 2 तारखेला बोलावलं होतं. पण हेवी ब्लिडिंग होतय म्हणून पेशंट 28 तारखेला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेला. 9 वाजून 1 मिनिटांची एन्ट्री दिसत आहे. पेशंटचा डॉक्टरांशी संपर्क झाल्यानंतर त्यांनी संबंधित स्टाफला सूचना दिली. डिलिव्हरीची ऑपरेशनची तयारी करा. पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्याआधी 10 लाखाची मागणी करण्यात आली. त्यावर कुटुंबाने आता तीन लाख रुपये आहेत ते घ्या. पुढच्या दोन-चार तासात किंवा उद्यापर्यंत व्यवस्था करतो असं सांगितलं. संबंधित रुग्णालयाला विविध विभागांकडून मंत्रालयातून फोन गेले. पण रुग्णालयाने कोणतीच दखल घेतली नाही” असं रुपाली चाकणकर यांनी सांगितलं.
‘तुमच्याकडे टॅबलेट असतील तर घ्या’
“9 वाजताची एन्ट्री असलेला पेशंट 2.30 वाजता रुग्णालयातून बाहेर पडला. पेशंट साडेपाचतास रुग्णालयात असताना हॉस्पिटलमध्ये कोणतेही उपचार झाले नाहीत. रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाला. रक्तस्त्राव रोखण्यासाठी डॉक्टरांनी पेशंटच्या नातेवाईकांना सांगितलं की, तुमच्याकडे टॅबलेट असतील तर घ्या, हे सर्व पेशंटसमोर घडत होतं. पेशंट खूप हळवी झालेली. त्यानंतर पेशंटला सूर्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्यांनी लगेच उपचारासाठी आतमध्ये घेतलं” अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली.