Pune News : इस्त्रो, नासा ही भांडी घेणार असल्याचे सांगत शेतकऱ्याची कोट्यवधीत फसवणूक, नेमके कसे फसवले शेतकऱ्यास वाचा
Pune Cirme News : पुणे जिल्ह्यात शेतकऱ्याची फसवणूक झाल्याचा नवीन प्रकार समोर आला आहे. या शेतकऱ्यास एक कोटी रुपयापेक्षा जास्त किंमतीत फसवले गेले आहे. अगदी त्यासाठी नासा आणि इस्त्रो संस्थेचे नाव भामट्याने घेतले. नेमका काय आहे प्रकार...
पुणे | 1 सप्टेंबर 2023 : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात फसवणुकीचा एक नवीन प्रकार समोर आला आहे. एका शेतकऱ्यांस विविध पद्धतीने आमिष दाखवून फसवले गेले आहे. आरोपीच्या म्हणण्यावर शेतकऱ्याने विश्वास ठेऊन शेताची विक्री करत त्याला पैसे दिले. परंतु हा सर्व प्रकार बनावट निघाल्यावर शेतकऱ्याने पोलिसांकडे धाव घेतली. बारामती पोलिसांनी या प्रकरणात चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. फसवणुकीच्या या प्रकारामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे.
कशी झाली फसवणूक
पुणे येथील रफिक तांबोळी याच्याशी २०१४ ते २०१६ च्या दरम्यान राजेंद्र बापूराव शेलार यांची ओळख झाली. त्यावेळी तांबोळी याने आपला आळंदी येथील वादातील प्लॉट आहे. हा प्लॉट विक्रीसाठी पैसे मागितले. तो प्लॉट विकल्यावर मला ५० कोटी रुपये मिळतील. त्यातील ४ कोटी रुपये तुम्हाला देईल. त्यासाठी मला १ लाख रुपये द्या, असे तांबोळी याने सांगितले. त्यानंतर १५ दिवसानंतर तांबोळी याने पुन्हा २ लाख रुपयांची मागणी केली. चार कोटी रुपये देण्याचे आमिष दाखवत एकूण ४ लाख ६५ हजार रुपये त्याने घेतले. हळहळू विविध कारण सांगत रफिक तांबोळी एकूण १२ ते १७ लाख रुपये त्यांच्या आणि त्याची पत्नी आतिया यांच्या खात्यावर शेलार यांना जमा करायला लावले.
इतर तिघांनी मिळूनही शेतकऱ्यास फसवले
रफिक याचा शोध घेत असतानाच सिराज शेख (राहणार पुणे), उमेश उमापुरे (रा. कासारशिरसी, ता.लातूर) आणि धनाजी पाटील (रा. सांगली) हे राजेंद्र शेलार यांना भेटले. यावेळी हे तिघे आणि तांबोळी यांनी मिळून काशाच्या भांड्याची माहिती राजेंद्र शेलार यांना दिली. ही भांडी २५० वर्षांपूर्वीची आहे. नासा आणि ईस्त्रो ही भांडी २०० ते ३०० कोटी रुपयात विकत घेते. या संस्था या भांड्याचा उपयोग वैज्ञानिक कारणासाठी करतात. या भांड्यांध्ये वीज पडून इलेक्ट्रीक पॉवर तयार केली जाते. यामुळे यांना प्रचंड मागणी असल्याचे सांगितले.
पुन्हा मागितले पैसे
भांड्यांची पडताळणी करावी लागते. त्यासाठी फी भरावी लागते. मला ९० लाख रुपये दिले तर सर्व पैसे परत करतो, असे शेलार यांना सांगितले. यामुळे शेलार यांनी त्यांची सणसर येथील ९० गुंठे जमीन विकली आणि त्यांना ९० लाख रुपये दिले. एकूण १ कोटी १३ लाख रुपये त्यांनी घेतले. त्यानंतर चौघांचे फोन बंद झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेतकऱ्याने बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.