पुणे पोटनिवडणुकीतील उमेदवारांकडे किती कोटींची संपत्ती, किती आहे दागिने?
पुणे येथील गर्भश्रीमंत उमेदवारांची माहिती समोर आली आहे. काही उमेदवारांकडे लाखांचा मोबाईल आहे. कोणाकडे कोट्यवधी रुपयांचे सोन्यांचे दागिने आहेत. शेती व्यापारातून त्यांचे हे उत्पन्न त्यांनी दाखवले आहे.
पुणे : कसबा आणि पिंपरी चिंचवडच्या पोटनिवडणुकीची (Pune by elections) अर्ज दाखल करण्याची मुदत आता संपलीय. काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी (NCP) आणि भाजप (BJP) उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यावेळी उमेदवारांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीचा तपशीलही जाहीर केला आहे. त्यातून पुणे येथील गर्भश्रीमंत उमेदवारांची माहिती समोर आली आहे. काही उमेदवारांकडे लाखांचा मोबाईल आहे. कोणाकडे कोट्यवधी रुपयांचे सोन्यांचे दागिने आहेत. शेती व्यापारातून त्यांचे हे उत्पन्न त्यांनी दाखवले आहे. कोणत्या उमेदवारांनी निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात काही माहिती दिली आहे पाहूया
अश्विनी जगताप यांच्यांकडे २ किलो सोने
अश्विनी जगताप यांच्यांकडे २ किलो ३३४ ग्रॅम सोन्याचे दागिने, १६ किलो चांदीचे दागिने, जेम्स स्टोन असे एकूण २ कोटी २२ लाखांचे दागिने आहेत. औंध येथील २ कोटी ८० लाखांची व्यावसायिक इमारत त्यांच्या नावावर आहे. त्यांच्यांकडे विविध पतसंस्था बँकांमध्ये २६ लाख ७८ हजार २५५ रुपयांच्या बचत ठेवी आहे. त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे.
एका लाखांचा मोबाईल कोणाकडे
लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी डमी अर्ज भरला आहे. त्यांच्यांकडे २३ कोटी ८९ लाखांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्यांकडे ८९ हजार ३२२ रुपये रोख तर बँकांमध्ये २७ लाख १४ हजार १७ रुपयांच्या ठेवी आहेत. विम्यामध्ये त्यांनी ७४ लाख ७० हजार ४३० रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यांच्यांकडे ३७६ ग्रॅम सोने आहे. त्यांच्यांकडे २६ हजाराची एक बंदूक, १ लाख २४ हजारांचा मोबाइल आहे.
राहुल कलाटे ३५ कोटींचे मालक
पिंपरी-चिंचवडमधून महाविकास आघाडीत बंडखोरी करणारे राहुल कलाटे यांच्यांकडे ३५ कोटी ६२ लाख ४० हजार ५९४ रुपायांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. त्यांच्यांवर १ कोटी १० लाख ७ हजार २४८ रुपायांचे कर्ज आहे. शेती अन् व्यापार हा त्यांचा व्यवसाय आहे. त्यातून त्यांचे ६२ लाख ४० हजार २७० रुपये वार्षिक उत्पन्न होते.
नाना काटे १९ कोटींचे मालक
पिंपरी चिंचवड विधानसभा मतदार संघातील राष्ट्र्वादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांच्यांकडे १९ कोटी ३० लाख १२ हजार रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. त्यांच्यांवर १ कोटी ९० लाख रुपयांचे कर्ज आहे. शेती, हॉटेल व बांधकाम त्यांचा व्यवसाय आहे. त्यांचे वार्षिक उत्पन्न १४ लाख ९७ हाजर ७८० रुपये आहे.
हेमंत रासने बारावी
भाजप उमेदवार हेमंत रासने यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. ते स्वतः बांधकाम व्यवसायीक आहेत. त्यांचे वार्षिक उत्पन्न ५ लाख ७५ हजार ४१० रुपये रुपये तर पत्नी मृणाली ४ लाख ३० हजार ८३० रुपये इतके दाखवले आहे. त्यांच्या नाववर स्थावर जंगम मालमत्ता ही १२ कोटी ४९ लाख ४५४ रुपये इतकी आहे. तर रोख रक्कम १ लाख ३५ हजार ९०० रुपये इतकी आणि १० तोळे सोने असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
रवींद्र धंगेकर आठवी
रवींद्र धंगेकर यांचे आठवीपर्यंतचं शिक्षण झालं आहे. त्यांची एकूण संपत्ती 8 कोटी 36 लाख 10 हजार 456 रुपये आहे. धंगेकरांकडे रोख रक्कम आणि बँकेतील ठेवी मिळून 47 लाख 6 हजार 128 एवढी रक्कम आहे. तर त्यांच्या पत्नी प्रतिभा यांच्या नावे 68 लाख 67हजार 376 एवढी रक्कम आहे. त्यांच्यांकडे 10 तोळे तर त्यांच्या पत्नीकडे 15 तोळे सोनं आहे.