वडिलांचा गाडीवरचा ताबा सुटला, कार थेट खडकवासला धरणात; आईसह तीन मुलींचा बुडून मृत्यू
विठ्ठल भिकुले यांना गाडीतून बाहेर पडता आले. ते पोहत बाहेर आले. | Car Falls Into River Near Panshet Dam
पुणे: वाहनावरील ताबा सुटून कार थेट खडकवासला धरणात (Khadakwasla dam)कोसळल्याच्या दुर्घटनेत आईसह तीन मुलींचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना समोर आली आहे. हे कुटुंब पुण्याच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला. या कुटुंबातील वडील वेळीच कारमधून बाहेर पडल्याने त्यांचा जीव वाचला. (Car fall into Khadakwasla dam in Pune)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल केशव भिकुले (वय 46, सध्या रा. चव्हाणनगर, धनकवडी; मुळ रा. विहिर ता. वेल्हे) हे आपल्या गावातून पुण्याकडे कुटुंबासह परतत होते. त्यावेळी कुरण फाट्याजवळ वाहनावरील भिकुले यांचे नियंत्रण सुटले. ही मोटार थेट खडकवासल्याच्या पाणलोटात शिरली.
यावेळी तेथे उपस्थित असणारे लोक मदतीला धावून गेले. मात्र, तोपर्यंत कार पाण्यात बुडाली होती. केवळ विठ्ठल भिकुले यांना गाडीतून बाहेर पडता आले. ते पोहत बाहेर आले. यादरम्यान ग्रामस्थांनी दोन मुलींचे मृतदेह बाहेर काढले. तर तिसरी मुलगी आणि त्यांच्या आईचा मृतदेह अग्निशामन दलाने बाहेर काढले. त्यानंतर गाडीही पाण्याबाहेर काढण्यात आली. विठ्ठल यांची पत्नी अल्पना (वय 45), मुलगी प्राजक्ता (वय 21), प्रणिता (वय 17), वैदेही (वय 8) यांचा मृत्यू झाला.
या सर्वांचे मृतदेह पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशामन दलाच्या कर्मचाऱ्यांनी रात्री आठच्या सुमारास बाहेर काढले. रात्री उशीरापर्यंत या प्रकरणी वेल्हा पोलिसांकडे गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.
पोटच्या पोराचं 5 दिवसांवर लग्न, आई-वडिलांना ट्रकने चिरडलं
मुलाच्या लग्नाला अवघे पाच दिवस बाकी राहिले असताना आई-वडिलांचा रस्ते अपघातात (Road Accident) दुर्दैवी अंत झाल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. संजय छानवाल आणि मीना छानवाल, असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. पुढच्या आठवड्यात त्यांच्या मुलाचे लग्न होते. मात्र, काळाने छानवाल कुटुंबीयांवर मोठा आघात केला आहे. (Road Accident in Aurgabad Maharashtra)
धुळे-सोलापूर महामार्गावर करोडीनजीक हा अपघात झाला. यावेळी संजय आणि मीना छानवाल दुचाकीवरुन प्रवास करत होते. तेव्हा भरधाव वेगात आलेल्या ट्रकने या दोघांना चिरडले. हा अपघात इतका भीषण होता की, संजय आणि मीना छानवाल यांच्या शरीराचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. हे दृश्य पाहून प्रत्यक्षदर्शींनाही भोवळ आली. या अपघातानंतर ट्रकचा चालक आणि क्लिनर दोघेही पळून गेले आहे. सध्या खुलताबाद पोलिसांकडून या दोघांचाही शोध घेतला जात आहे.
संबंधित बातम्या :
वहिनीचं वैधव्य दूर केलं, भावाच्या मृत्यूनंतर पुतणीसाठी वहिनीशी लग्न
अवघ्या पाच दिवसांवर लग्न, पत्रिका देण्यास गेलेल्या नवरदेवाचा बाईक अपघातात मृत्यू
(Car fall into Khadakwasla dam in Pune)