Ganesh Utsav : पुणे गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत ‘हे’ घेतले महत्वाचे निर्णय
Pune Ganesh Utsav : गणेशोत्सव काही दिवसांवर आला आहे. पुणे, मुंबईतील गणेश उत्सव मंडळांनी गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरु केली आहे. पुण्यात यासंदर्भात आज बैठक झाली आहे.
पुणे | 28 ऑगस्ट 2023 : राज्यातील सर्व गणेशभक्त आता गणेशोत्सवाची वाट पाहत आहेत. गणेशोत्सवाला प्रारंभ 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठी गणेश मंडळांनी तयारी सुरु केली आहे. पुणे आणि मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी देखाव्यांचे काम सुरु केले आहे. पुणे जिल्ह्यातील गणेश मंडळांच्या मागण्या आणि समस्या जाणून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
काय झाले निर्णय
गणेश उत्सव पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. रात्री उशिरापर्यंत देखावे सुरु असतात. यामुळे या भाविकांच्या सोयीसाठी मेट्रो रात्री १२ वाजेपर्यंत सुरु करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. त्यानुसार पाचव्या दिवसापासून दहाव्या दिवसापर्यंत १२ वाजेपर्यंत मेट्रोची सेवा सुरु ठेवण्याच्या सूचना मेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
परवानगीसंदर्भात काय झाला निर्णय
गणेश मंडळांच्या परवानगीसंदर्भात बैठकीत चर्चा झाली. मंडळांना पाच वर्षांसाठी परवानगी देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. एकवेळा परवानगी दिल्यानंतर ती पाच वर्ष असणार आहे. वाद्य परवाना, मंडप परवाना, वाहतूक कोंडी या विषयावर बैठकीत चर्चा झाली. पुणे शहरातील गणेशोत्सव पाहण्यासाठी देशातूनच नव्हे तर विदेशातून भाविक येतात. त्यासाठी चोख व्यवस्था ठेवण्यात येणार आहे.
विसर्जन मिरवणूक वेळेत
विसर्जन मिरवणूक वेळेवर पार पाडण्यासंदर्भात चर्चा झाली. यंदापासून गणरायाचे विसर्जन वेळेत होण्यासाठी दगडूशेठ गणपती मंडळ दुपारी ४.३० वाजताच मिरवणुकीत सहभागी होणार आहे. तसेच विसर्जन वेळेत होण्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्याला गणेश मंडळाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळल्याचे अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीला पुणे शहराचे पोलीस आयुक्त रितेश कुमार, पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल देखील उपस्थित होते.