पुणे पोटनिवडणुकीचा उद्या निकाल, पहिला फेरीच्या निकाल किती वाजता येणार ?
कसबा पेठेसाठी मतमोजणी कोरेगाव पार्क येथील धान्य गोदामात होणार आहे. तर चिंचवडसाठी मतमोजणी थेरगाव येथील शंकरअण्णा गावडे कामगार भवनात होणार आहे.
पुणे : कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान पार पडले. कसबापेठ विधानसभा मतदार संघात ५०.०६ टक्के मतदान झाले. तर पिंपरी चिंचवडसाठी ५०.४७ टक्के मतदान झाले होते. कसबा पेठांमध्ये काही भागांत कमी मतदान झाले. त्याचा फटका कोणाला बसणार याचा निर्णय गुरुवारी लागणार आहे. गुरुवारी (ता. २ मार्च) सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असली तरी निकालाचे चित्र दुपारी १२ वाजेपर्यंत स्पष्ट होईल. परंतु निकालाचा पहिली फेरी सकाळी ८.३० वाजेपर्यंत संपणार आहे. राज्याचे विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असताना पोटनिवडणुकीचा निकाल येत असल्याने सत्ताधारी-विरोधकांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.
कसबा पेठेत कोणाचे पारडे जड
कसब्यातून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर, भाजपचे हेमंत रासने आणि हिंदू महासंघाचे आनंद दवे यांच्यात लढत आहे. कसबा पेठेसाठी मतमोजणी कोरेगाव पार्क येथील धान्य गोदामात होणार आहे. तर चिंचवडसाठी मतमोजणी थेरगाव येथील शंकरअण्णा गावडे कामगार भवनात होणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. कसबा पेठ मतमोजणीसाठी १४ टेबल करण्यात आले आहे. मतमोजणीच्या २० फेऱ्या होणार आहे. एका फेरीसाठी सुमारे १५ ते २० मिनिटांचे वेळ लागणार आहे. म्हणजे पहिल्या फेरीचा निकाल सकाळी ८.३० वाजेपर्यंत येणार आहे. दुपारी १२ पर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.
कोरेगाव पार्क वाहतुकीत बदल
कोरेगाव पार्क येथील धान्य गोदामात मतमोजणी होणार असल्याने वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. नागरिकांनी या भागातून जाताना या बदलाची नोंद घ्यावी, असे वाहतूक पोलिसांनी कळवले आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये ३७ फेऱ्या
पिंपरी चिंचवडमध्ये एकूण २८ उमेदवार रिंगणात आहे. तरी प्रमुख लढत भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीतील नाना काटे व अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यांत लढत आहे. गुरुवारी होणाऱ्या मतमोजणीत ३७ फेऱ्यांमध्ये निकाल येणार आहे. त्यामुळे दुपारी १२ वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. मतमोजणीच्या दिवशी गावडे कामगार भवन परिसरात जमावबंदीचे आदेश दिले आहे.
भाजपची व्होटबँक
कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपची हक्काची व्होटबँक पेठा आहेत. कसबा पेठेतील सदाशिव, नारायण, शनिवार पेठांमधील मतदानाची टक्केवारी 2019 च्या तुलनेत पाच टक्के घटल्याचे समोर आले आहे. 2019 मध्ये आमदार मुक्ता टिळक यांना या विभागातून तब्बल 21 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. आता हा धक्का नेमका कुणाला बसणार, यावर चर्चा सुरु झाली आहे. परंतु भाजपचे हक्काचे मतदार असल्याने त्या पक्षाला हा फटका बसणार असल्याचे सांगितले जात आहे.