Video : महामार्गावर थरार, ट्रक ओव्हरलोड आहे का? विचारताच मद्यधुंद चालकाने १२ किमी फरफटत नेले
Pune News : पुणे- सातारा महामार्गावर थरार सुरु होता. टोल नाक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा जीव धोक्यात होता. मद्यधुंद ट्रक चालकाने त्या कर्मचाऱ्यास १२ किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. अंगावर शहारे आणणारा हा व्हिडिओ व्हायरल होतोय...
विनय जगताप, भोर, पुणे, दिनांक 15 जुलै 2023 : पुणे सातारा महामार्गावर सुमारे दहा, पंधरा मिनिटे थरार सुरु होता. एका ट्रक चालकाने बारा किलोमीटरपर्यंत कर्मचाऱ्याला ट्रकवर लटकून नेले. त्याला त्या कर्मचाऱ्याने थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु मद्यधुंद असलेला मुजोर ट्रक चालक आपल्या मस्तीत होता. त्या कर्मचाऱ्याचा जीव टांगणीला होता. हा सर्व प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात एकाने कैद केला. त्यानंतर अंगावर शहारे आणणारा तो व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
काय झाला प्रकार
पुणे सातारा महामार्गावर खेडशिवापूर टोल नाक्यापासून या प्रकारास सुरुवात झाली. टोल नाक्यावर तैनात असलेल्या सौरभ कोंडे या कर्मचाऱ्याला ट्रक चालकाने बारा किलोमीटरपर्यंत ट्रकला लटकून नेले. त्या कर्मचाऱ्याने तुझा ट्रक ओव्हरलोड आहे का? हा प्रश्न विचारला. मग मद्यधुंद असलेल्या त्या चालकाने ड्रायव्हर साईडने चढलेल्या त्या टोल कर्मचाऱ्याला घेऊन धूम ठोकली.
खेड-शिवापूर टोलनाक्यावरील हा थरार १२ किमी सुरुच होता. कर्मचाऱ्याचा जीव होता धोक्यात… pic.twitter.com/G9HJ0oBCaM
— jitendra (@jitendrazavar) July 15, 2023
ट्रकचालकाचा थरार
ट्रकवर टोल कर्मचारी लटकलेला होता अन् ट्रक चालक थांबण्यास तयार नव्हता. जवळपास बारा किलोमीटर पर्यंत हा थरार सुरु होता. मद्यधुंद असलेला ट्रक चालक पुणे सातारा महामार्गावर वेडावाकडा ट्रक वेगाने चालवत होता. हा थरार दहा ते पंधरा मिनिटे सुरु होता. एकाने मोबाईल कॅमेरामध्ये हा सर्व प्रकार कैद केलाय. तो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या मार्गावर नसरापूर येथील गावकऱ्यांनी ट्रक अडवला. त्यावेळी ट्रकचालक थांबला अन् लटकलेल्या सौरभ कोंडे यांची सुटका झाली. मृत्यूच्या दारातून सौरभ कोंडे बाहेर आले.
गावकऱ्यांनी दिले पोलिसांच्या ताब्यात
TN48 BC6280 नंबर हा ट्रक अन् चालक यांना गावकऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. पुणे सातारा महामार्गावर खेडशिवापूर टोल ते नसरापूर गावापर्यंत हा प्रकार सुरु होता. किकवी पोलिसांनी त्या ट्रक चालकास ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा ट्रक कोठून आला होता, कुठे जात होता, त्याच्या काय सामान होते? या प्रश्नांची उत्तरे पोलिसांच्या तपासानंतरच मिळणार आहे.