Pune Metro : मेट्रो पुणेकरांच्या पसंतीस उतरली का? दोन दिवसांत किती जणांनी केला मेट्रोतून प्रवास
Pune Metro : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑगस्ट रोजी पुणे मेट्रोच्या दोन प्रकल्पांचे उद्घाटन केले. यानंतर मेट्रो पुणेकरांसाठी सुरु झाली. पुणेकरांनी या मेट्रोस कसा प्रतिसाद दिला, किती जणांनी मेट्रोतून प्रवास केला...
रणजित जाधव, पुणे | 3 ऑगस्ट 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १ ऑगस्ट रोजी पुणे मेट्रोचे उद्घाटन झाले. सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड आणि गरवारे कॉलेज स्टेशन ते रूबी हॉल या दोन योजनांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. यानंतर पुणे मेट्रो सर्वसामान्यांसाठी सुरु झाली. १ ऑगस्ट आणि २ ऑगस्ट या दोन दिवसांत किती पुणेकरांनी मेट्रोतून प्रवास केला, मेट्रोसंदर्भात त्यांचा काय आहे अनुभव? याची माहिती उपलब्ध झाली आहे.
किती जणांनी केला प्रवास
मेट्रो पुणेकरांच्या पसंतीस उतरल्याचे चित्र दिसत आहे. पंतप्रधान मोदी यांनी उद्घाटन केल्यानंतर मंगळवारी सायंकाळी पाचवाजेपासून मेट्रो सर्वसामान्यांसाठी सुरु झाली. मंगळवार ते बुधवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत 41 हजार 690 जणांनी मेट्रो प्रवासाचा आनंद घेतला. यामध्ये विद्यार्थी अन् सर्वसामान्य नागरिकांचा समावेश आहे. उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच दोन तारखेला १० हजार ८२० प्रवाशांनी पिंपरी ते सिव्हील कोर्ट प्रवास केला तर दुसऱ्याच दिवशी या दोन्ही मार्गावर एकूण ३० हजार ३२० प्रवाशांनी प्रवास केला.
केव्हा किती जणांचा प्रवास
उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच दोन तारखेला १० हजार ८२० प्रवाशांनी पिंपरी ते सिव्हील कोर्ट प्रवास केला तर १९४९४ प्रवाशांनी वनाज ते सिव्हील कोर्ट प्रवास केलाय. दुसऱ्याच दिवशी या दोन्ही मार्गावर ऐकून ३० हजार ३२० प्रवाशांनी एकेरी मार्गावर प्रवास केल्याने येत्या काही दिवसात मेट्रोला पिंपरी कर आणि पुणेकर चांगलीच पसंती देतील अशी शक्यता आहे.
मेट्रो प्रवासाचे फायदे काय
मेट्रोमुळे पुणे शहरातील नागरिकांना आणखी एक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मिळाली आहे. या वाहतूक व्यवस्थेमध्ये वाहतूक कोंडीची कटकट नाही. प्रदूषण नाही. वेगवान प्रवास कमी खर्चात होत आहे. यामुळे वेळेची अन् पैशांची बचत होत आहे. तसेच विद्यार्थ्यांना तिकीट दरात ३० टक्के सवलत दिली गेली आहे. यामुळे पुणेकरांच्या पसंतीस मेट्रो उतरली असल्याचे दिसून येत आहे. मेट्रोने शनिवारी आणि रविवारी प्रवास करताना सर्वांना ३० टक्के सवलत मिळणार आहे. यामुळे शनिवार अन् रविवारी मेट्रोतील प्रवाशांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
किती वेळेत आहे सेवा
मेट्रो सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत सुरु असणार आहे. गर्दीच्या वेळेत दर 10 मिनिटांनी मेट्रोच्या फेऱ्या असतील तर 12 ते 4 या वेळेत दर 15 मिनिटांनी मेट्रो उपलब्ध असणार आहेत. वनाझ ते पिंपरी चिंचवड मार्गावर 35 रुपये तिकीट दर आहे. पिंपरी चिंचवड ते सिव्हिल कोर्टसाठी 30 रुपये दर आहे. पिंपरी चिंचवड ते पुणे स्टेशनसाठी 30 रुपये तिकीट दर असून हा प्रवास २५ ते ३० मिनिटांमध्ये होत आहे.