MPSC विद्यार्थ्यांसाठी आमदाराने घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट, काय केली मागणी
Pune MPSC News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी राज्यातील लाखो तरुण करतात. पुणे शहरातील मोठ्या संख्येने एमपीएससी परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आहेत. त्यांचे अनेक प्रश्न आहेत. त्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झालीय...
योगेश बोरसे, पुणे, दिनांक 15 जुलै 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन शासन सेवेत जाण्याचे स्वप्न अनेक तरुण पाहत असतात. त्यासाठी पुणे शहरात अनेक तरुण तयारी करत आहेत. एमपीएससी परीक्षेच्या जाहिरातीची वाट पाहत असतात. त्यानंतर निकाल कधी येईल, त्याची वाट पाहतात. परंतु अनेक वेळा जाहिरात वेळेवर येत नाही, जाहिरात आली तर त्यात पुरेशी पदे नसतात, निकालास विलंब होत असतो, यामुळे परीक्षा देणारे तरुण, तरुणी यांच्यात नाराजी असते. आता या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी पुढाकर घेतला आहे.
का घेतली फडणवीस यांची भेट
आमदार अभिमन्यू पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी फडणवीसांची ही भेट घेतली. 2023 च्या एमपीएससी जाहिरातीत पदांची वाढ करण्याचे पत्र त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिले. या जाहिरातीत अवघ्या 295 पदांची भरती होणार असल्याचे एमपीएससीने म्हटले आहे. परंतु एकूण 31 संवर्गापैकी केवळ 14 संवर्गाची पदे यामध्ये आहेत. त्यामुळे 20 संवर्गाची पदे यामध्ये समाविष्ट करून जागा वाढवण्याची मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी फडणवीस यांच्याकडे केली. देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करुन आढावा घेण्यात येणार असल्याचे त्यांना सांगितले.
अशी होती जाहिरात
एमपीएससी सिव्हील सर्व्हिस ग्रुप ए आणि बी साठी 295 पदांची जाहिरात निघाली होती. एमपीएससी आर्किटेक्चरल इंजीनियरिंग सर्व्हिस ग्रुप ए आणि बी साठी 130 पदे भरली जाणार आहे. एमपीएससी इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग सर्व्हिस ग्रुप बी साठी 15 पद भरण्यात येणार आहे. लीगल मेट्रोलॉजी इंस्पेक्टर म्हणून 39 पदे भरली जाणार आहे. अन्न् व औषध प्रशासन विभागाची 194 पदांसाठी जाहिरात निघाली होती.
विद्यार्थ्यांचे लागले लक्ष
आमदार अभिमन्यू पवार यांनी केलेल्या मागणीनुसार 20 संवर्गाची पदे आणखी भरली गेली तर त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. यामुळे त्याच्या मागणीनंतर शासन काय निर्णय घेते, याकडे राज्यभरातील एमपीएससी देणाऱ्या विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.