आजपासून पुणे-मुंबई प्रवास फक्त एका तासात, पाहा वेळ अन् तिकीट दर
पाच वर्षांनंतर पुणे ते मुंबई हा हवाई मार्ग सुरु झाला आहे. पुणे-मुंबई हवाई मार्ग फक्त 124 किलोमीटरचा आहे. देशातील सर्वांत कमी अंतराचा हा हवाई मार्ग आहे. मुंबईवरुन इतर ठिकाणी विमानाने जाणाऱ्या प्रवाशांना या विमानसेवेचा चांगलाच फायदा होणार आहे. त्यांचा वेळ वाचणार आहे.
पुणे : पुणेकरांची गेल्या पाच वर्षांपासून असलेली मागणी आज पूर्ण झाली आहे. आता पुणे मुंबई प्रवास फक्त तासाभरात करता येणार आहे. टाटा समूहाच्या मालकीची एअर इंडियाकडून येत्या 26 मार्चपासून मुंबई-पुणे, पुणे-मुंबई दरम्यान हवाई सेवा सुरू होणार आहे. पहिल्याच दिवशी या विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. विमानाचे सर्व तिकिटांची विक्री झाली आहे. पुणे-मुंबई प्रवासासाठी यापूर्वी जेटएअरवेजची सेवा होती. ती बंद झाल्यानंतर पुणे-मुंबई थेट विमानसेवा नव्हती. आता 26 मार्चपासून ती सुरु झाली.
काय आहे तिकीट दर
पुणे ते मुंबई हा हवाई मार्ग फक्त 124 किलोमीटरचा आहे. देशातील सर्वांत कमी अंतराचा हा हवाई मार्ग आहे. एअर इंडियाच्या संकेतस्थळानुसार पुणे ते मुंबई इकॉनॉमी क्लाससाठी २२३७ रुपये तर सुपर व्हॅल्यू इकॉनॉमी क्लाससाठी ३७३८ असा तिकीट दर आहे. फ्लेक्सी सेव्हर इकॉनॉमी ६५७३ अन् फेक्झिबल इकॉनॉमीसाठी ११ हजार ८२३ रुपये तिकीट दर आहेत. तसेच मुंबई ते पुणे इकॉनॉमी क्लाससाठी १९२२ रुपये तर सुपर व्हॅल्यू इकॉनॉमी क्लाससाठी ३४२३ असा तिकीट दर आहे. फ्लेक्सी सेव्हर इकॉनॉमी ६२५८ अन् फेक्झिबल इकॉनॉमीसाठी ११ हजार ५०८ रुपये तिकीट दर आहेत.
आठवड्यातील सहा दिवस विमान
- शनिवार वगळता दररोज दोन शहरांदरम्यान हे विमान उड्डाण करेल.
- मुंबईवरून सकाळी 9 वाजून 45 मिनिटांनी विमान उड्डाण करेल आणि ते 10 वाजून 45 मिनिटांनी पुण्यात पोहोचेल.
- पुण्यातून हे विमान सकाळी 11 वाजून 20 मिनिटांनी उड्डाण करेल आणि मुंबईत 12 वाजून 20 मिनिटांनी पोहोचेल.
- विमानात ११४ इकॉनॉमी क्लास सीट तर ८ बिझनेस क्लॉसचे सीट आहेत.
फेऱ्या वाढण्याची शक्यता
एअर इंडियाने थेट उड्डाण सेवा सुरू केल्यामुळे मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाण करणारे प्रवासी पुणे ते मुंबईचे विमान पकडू शकतात. त्यानंतर आंतरराष्ट्रीय विमान त्याच जागेवरुन पकडता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून फायदाही होणार आहे. आता सकाळी सुरु झालेल्या सेवेला मिळालेल्या प्रतिसादानंतर संध्याकाळच्या सेवेचा विचार करण्यात येणार असल्याचे एअर इंडियातर्फे सांगण्यात आले.
Good News पुणे-मुंबई प्रवास आता फक्त तासाभरात, देशातील होणार ‘हा’ विक्रम…वाचा सविस्तर