चोरट्यांनी चोरी तरी कसली करावी, विचार करा अन् वाचा चोरले तरी काय?
Pune News : चोरीची ही बातमी जरा वेगळीच. चोरट्यांनी या ठिकाणी रोकड रक्कम लंपास केली नाही की दागिने. त्यांनी जी चोरी केली त्याची आतापर्यंत चोरी झालीच नसणार. परंतु या चोरट्यांना पश्चातबुद्धी झाली अन्...
पुणे : चोरीच्या अनेक घटनांची नोंद पोलिसांकडे होत असते. मोठी चोरी असली की मोठ्या बातम्या होतात. मग हे चोरटे शेतातील वायरपासून श्रीमंताच्या घरातील वस्तू अन् रोकडची चोरी करतात. परंतु सर्व बाबतीत वेगळे असणारे पुणे शहरातील चोरटेही वेगळेच असणार. या चोरट्यांनी वेगळाच काही तरी चोरण्याचा प्लॅन केला अन् चोरी करण्यात यशस्वी झाले. परंतु त्यानंतर त्यांना पश्चातबुद्धी झाली अन् चोरी केलेली वस्तू सोडून त्यातून पाच हजार रुपये किंमतीच्या वस्तू काढून घेतल्या.
कसली केली चोरी
दुचाकी, चारचाकी चोरीला जाणे अनेकवेळा शक्य होते. परंतु मोठ्या वाहनांची चोरी करणे अवघड असते. यामुळे मोठ्या वाहनांचे सुट्टे भाग लंपास केले जातात. परंतु पुणे शहरातील चोरटे वेगळेच. त्यांनी नवी शक्कल लढवली अन् ‘पीएमपी’ची बस चोरण्याची करामत केली. पुणे शहरातील सणस मैदानाजवळ हा प्रकार घडला. पीएमपीची बस चोरीला गेल्याच्या प्रकारानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. आता बस पार्किंगच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शेवटी बसचे काय झाले
चोरट्यांनी बस चोरली खरी पण पश्चातबुद्धी झाल्यानंतर ती बस सणस मैदानावरुन मार्केट यार्ड बस डेपोजवळ सोडली. परंतु बस सोडली तरी काही तरी चोरी करावीच लागण्याचा चोरीधर्म त्यांनी जपला अन् पाच हजार रुपयांची बॅटरी घेऊन ते लंपास झाले. सणस मैदान ते मार्केट यार्ड बस डेपो या रस्त्यावर हा प्रकार घडला.
गुन्हा केला दाखल
स्वारगेट आगारातून धावणाऱ्या बस फेऱ्या संपल्यानंतर पूलगेट येथील महात्मा गांधी बस आगारात उभ्या केल्या जातात. परंतु पुण्यात सुरु असलेल्या पालखी सोहळ्यामुळे पूलगेट येथे बस लावण्यास जागा नाही. यामुळे मंगळवारी रात्री बस सारसबागेजवळील सणस मैदानाजवळ उभी केली. चालक चावी काढून घ्यायला विसरला. मग चोरट्यांनी संधी साधली अन् बसची चोरी केली. परंतु मार्केट यार्डाजवळ बस सोडून पाच हजार रुपयांची बॅटरी पळवली. बस चोरीला गेल्याचे बुधवारी (१४ जून) लक्षात आल्यानंतर शोध सुरु झाला अन् बस मार्केट यार्ड आगाराजवळ सापडली. चोरी प्रकरणानंतर पीएमपी प्रशासन खळबडून जागे झाले. स्वारगेट डेपोचे सुरक्षाधिकारी सुरेश सोनवणे यांच्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा
तुला आम्ही कोण आहे ते दाखवितो म्हणत…चक्क पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण