Pune dilapidated wadas : पुण्यात 245 वाडे जीर्ण अन् राहण्यास धोकादायक! महापालिकेनं बजावली नोटीस
महापालिकेने मालकांना नोटिसा बजावल्यानंतर जुने, मोडकळीस आलेले आणि अनधिकृत वाडे पाडण्यास सुरुवात केली आहे. उन्हाळ्यात केलेल्या वार्षिक सर्वेक्षणाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
पुणे : पुणे महानगरपालिकेने (PMC) पावसाळ्यापूर्वी 245 जीर्ण वाड्यांतील रहिवाशांना नोटीस बजावली आहे. हे वाडे अस्थिर आणि राहण्यासाठी धोकादायक असल्याचे कारण देत अधिकाऱ्यांनी नोटीस पाठवली आहे. याठिकाणाहून तत्काळ स्थलांतरित न झाल्यास कोणतीही अनुचित घटना घडू शकते. धोकादायक (Dangerous) असलेले 14 जीर्ण वाडे पाडण्यात आले आहेत. तर आम्ही वाड्यांच्या मालकांवर आणि रहिवाशांवर लक्ष ठेवून आहोत, ज्यांना आम्ही बांधकाम पाडण्याची माहिती दिली आहे, अशी प्रतिक्रिया पुणे महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागातील (Building permission department)अधिकाऱ्यांनी दिली आहे. महापालिकेने या वाड्यांची C1, C2 आणि C3 या तीन श्रेणींमध्ये विभागणी केली आहे. ज्या वास्तूंची नासधूस करायची आहे ती C1 श्रेणीत मोडतात तर C2 संरचनांना दुरुस्तीची गरज असते आणि C3 संरचनांसाठी किरकोळ कामे आवश्यक असतात. महापालिका दरवर्षी जुन्या वाड्यांचे सर्वेक्षण करते.
भाडेकरू आणि मालक यांच्यातील वाद
नागरी अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, महापालिकेने मालकांना नोटिसा बजावल्यानंतर जुने, मोडकळीस आलेले आणि अनधिकृत वाडे पाडण्यास सुरुवात केली आहे. उन्हाळ्यात केलेल्या वार्षिक सर्वेक्षणाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. सोमवार पेठ, कसबा पेठ, घोरपडे पेठ, मंगळवार पेठ आणि आजूबाजूच्या भागात असलेल्या बहुतेक बांधकामे प्रामुख्याने पेठ भागात पाडण्यात आली आहेत. पीएमसी या वाड्यांच्या घसरलेल्या भागांमुळे अपघात झाल्याची नोंद करते. अशा अपघातांमुळे अनेक नागरिकांना दुखापत झाली आहे. अनेकांना प्राणही गमवावे लागले आहेत. भाडेकरू आणि मालक यांच्यातील वादामुळे अनेक वर्षांपासून या मालमत्तांचा पुनर्विकास रखडला आहे.
इमारतीवरील हक्क संपुष्टात येण्याची वाटते भीती
कायदेशीर नोटीस बजावल्यानंतरही काही रहिवासी घरावरील ताबा सोडण्यास तयार नसतात. या जुन्या, मोडकळीस आलेल्या वास्तूंमधील रहिवाशांना अनेकदा भीती वाटते, की एकदा बिल्डरने संरचनेचा पुनर्विकास केला की त्यांचा इमारतीवरील हक्क संपुष्टात येईल. अनेक पुनर्विकास किंवा दुरुस्तीचे प्रकल्प कायदेशीर लढाईमुळे ठप्प झाले आहेत. काही प्रकरणांमध्ये धोकादायक इमारती रिकाम्या करण्यासाठी महापालिकेने पोलिसांची मदत घेतली होती. वर्षानुवर्षे कमकुवत झालेल्या वास्तू कोसळल्या असून त्यामुळे रहिवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहेत तर काहींना इजादेखील झाली आहे.