Pune News | पुणे मनपा आक्रमक, भाजपच्या माजी खासदारास पाठवली नोटीस, 30 दिवसांचा अल्टीमेटम
Pune News | पुणे महानगरापालिकेकडून धडक कारवायांचे सत्र सुरु आहे. शहरातील रुफटॉप हॉटेल्सवर कारवाई केली जात आहे. त्याचवेळी राजकीय नेत्यांसंदर्भातही निर्णय घेतला गेला आहे. आता भाजपच्या माजी खासदारास नोटीस पाठवली आहे.
पुणे | 15 ऑक्टोंबर 2023 : पुणे महानगरपालिकेवर प्रशासक राज सुरु आहे. प्रशासक असल्यामुळे धडाकेबाज निर्णयही घेतले जात आहेत. शहरातील अतिक्रमणाविरोधात मनपाकडून कारवायांचे सत्र सुरु आहे. आता भारतीय जनता पक्षाच्या एका माजी खासदारास नोटीस पाठवली आहे. मनपाकडून त्या खासदारास तीस दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. 30 दिवसांच्या आत अनधिकृत बांधकाम काढून घ्यावे, अन्यथा महापालिकेच्या वतीने कारवाई करण्याचा इशारा नोटीसमध्ये दिला आहे. पुणे मनपाकडून घेतलेल्या या भूमिकेचे स्वागत होत आहे.
कोणाला पाठवली नोटीस
पुणे येथील भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार संजय काकडे यांना पुणे महानगरपालिकेकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. संजय काकडे यांचे कर्वेनगर येथील काकडे पॅलेस मंगल कार्यालय आहे. या मंगल कार्यालयात अनधिकृत बांधकामप्रकरणी पुणे महापालिकेकडून संजय काकडे यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. मनपाकडून अतिक्रमण असणाऱ्यांवर सर्वांना कारवाई होत असल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.
काय म्हटले आहे नोटीसमध्ये
पुणे मनपाने दिलेल्या नोटीसीत म्हटले आहे की, 30 दिवसांच्या आत अतिक्रमण असलेले बांधकाम काढून घ्यावे, अन्यथा महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात येणार आहे. पुणे महापालिकेच्या नोटीसनुसार मंगल कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर विनापरवाना 251 चौरस मीटर आणि तिसऱ्या मजल्यावरील 320 चौरस मीटरचे संपूर्ण बांधकाम अनधिकृत आहे. त्यामुळे पुणे महापालिकेने माजी खासदार संजय काकडे यांना नोटीस पाठवली आहे.
हॉटेल्सवर कारवाई
पुणे मनपाकडून शहरातील रुफटॉप हॉटेल्सवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अनधिकृतपणे असलेल्या या रुफटॉप हॉटेल्सवर कारवाई केली जात आहे. यामुळे हॉटेल्सधारकांमध्ये खळबळ उडाली आहे. आतापर्यंत नऊ हॉटेल्स पाडण्यात आल्या आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ही कारवाई केली जात आहे. या परिसरात अग्निशमन दलाने केलेल्या सर्वेक्षणात ४९ रुफटॉप हॉटेल्स अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे त्या हॉटेल्सवर कारवाई करण्याची भूमिका मनपाकडून घेण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी एका मोठ्या हॉटेलवर मनपाने कारवाई केली होती. परंतु दुसऱ्या एका हॉटेलवरील कारवाई थांबवण्यात आली होती.