आता कबुतरांना दाणे टाकाल तर खबरदार !, ‘या’ कारणामुळे पालिकेने उगारला कारवाईचा बडगा
अनेक पक्षीप्रेमी कबुतरांना दररोज दाणे खायला घालतात. यामुळे कबुतरांचा वावर निवासी परिसरात वाढला आहे. मात्र आता पक्षीप्रेमींना कबुतरांना दाणे देणे महागात पडणार आहे.
पुणे : राज्यभरात उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला असताना अनेक पक्षीप्रेमी सार्वजनिक ठिकाणी पक्ष्यांना खाद्य घालत आहेत. अशा पक्षीप्रेमींना सध्या मात्र पालिका प्रशासनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. पुणे महापालिकेने या कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. पुण्यातील एका व्यक्तीने कबुतरांसाठी बाहेर दाणे फेकले. यातून पुण्य कमावण्याचा व्यक्तीचा हेतू होता. मात्र याच विधायक कृत्याने त्याला पालिकेच्या दंडात्मक कारवाईला तोंड द्यायला लावले. पुणे पालिका प्रशासनाने संबंधित व्यक्तीकडून पाचशे रुपयांच्या दंडाची पावती फाडली. या कारवाईवर पुणेकरांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून ही कारवाई केली जात आहे.
सार्वजनिक ठिकाणी कबुतरांसाठी दाणे फेकणाऱ्यांवर वक्रदृष्टी
मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणी कबुतरांसाठी दाणे फेकणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे फुटपाथ, चौक, नदीकिनारी, तलावांच्या परिसरात कबुतरांचा उपद्रव वाढला आहे. पक्षीप्रेमी वारंवार दाणे फेकत असल्यामुळे ते खाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कबुतरांची झुंबड उडते. परिणामी या कबुतरांची विष्टा पसरलेली असते. यामुळे रोगराईला निमंत्रण मिळत असल्याचा पुणे महानगरपालिकेतील आरोग्य विभागाचा दावा आहे. याच अनुषंगाने महापालिकेने सध्या दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे.
या कारवाईदरम्यान सार्वजनिक ठिकाणी कबुतरांसाठी दाणे फेकणाऱ्यांवर वक्रदृष्टी ठेवण्यात आली आहे. जे नागरीक सार्वजनिक ठिकाणी कबुतरांचा उपद्रव वाढवण्यास कारणीभूत ठरत आहे, त्या नागरिकांवर कारवाई केली जात आहे.
कबुतरांची वाढती संख्या पालिकेसाठी ठरली नवी डोकेदुखी
पुणे महापालिकेच्या हद्दीत सध्या कबुतरांची संख्या प्रचंड वाढली आहे. यात पक्षीप्रेमी सार्वजनिक ठिकाणी दाणे फेकत असल्यामुळे कबुतरांचा प्रमुख चौकांमध्ये वावर वाढला आहे. महापालिका प्रशासनासमोर या पक्ष्यांची संख्या नियंत्रणात आणण्याचे प्रमुख आव्हान उभे राहिले आहे. श्वसनाचे विकार तसेच दम्याच्या रुग्णांना या कबुतरांमुळे मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे.
नागरिक पुण्यकर्म म्हणून पक्ष्यांना खाद्य घालतात. मात्र त्याचा रुग्णांना होणारा त्रास विचारात घेतला पाहिजे. याच अनुषंगाने आम्ही एकीकडे दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. तसेच अनेकांचे समुपदेशन देखील केले जात आहे, अशी माहिती पालिकेतील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.