ना. धों. महानोर यांच्या जाण्याने शेतशिवार, पिकं सुद्धा गहिवरून गेलीत; साहित्य विश्व हळहळलं
Poet Namdev Dhondo Mahanor Passed Away : ना. धों. महानोर कृषी प्रधान आयुष्य जगले, शेतकरी आत्महत्या रोखल्या जाव्यात यासाठी ते व्याकुळ झाले, त्यातूनच कवितांचा जन्म झाला; रानकवींच्या जाण्याने साहित्य विश्व शोकाकूल

पुणे | 03 ऑगस्ट 2023 : प्रसिद्ध रानकवी ना.धों. महानोर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 81 व्या वर्षी कवी महानोर यांनी अखेरचा श्वास घेतला. मागच्या काही वर्षांपासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. महानोर यांच्या जाण्याने संवेदनशील माणूस हरपल्याची भावना मराठी साहित्य विश्वातून व्यक्त होत आहे.
ज्येष्ठ साहित्यिक फकीरराव मुंजाजी शिंदे अर्थात फ. मु. शिंदे यांनीही ना. धों. महानोर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ना. धों. महानोर यांच्या जाण्याने रान शिवार आणि शेतातील पिकं सुद्धा गहिवरून गेली आहेत, असं ते म्हणालेत.
ना. धों. महानोर यांनी रानातील कविता लिहिल्या, रानातच राहिले. महानोर आज आपल्यात नाहीत यावर विश्वास बसत नाही. विश्वास ठेवावाही वाटत नाही, असं शिंदे म्हणाले.
आता महानोर यांची फक्त प्रत्यक्ष भेट कधी होणार नाही. मात्र ते अंतःकरणात असल्यामुळे त्यांच्याशी बोलणे मात्र सतत होत राहील, असं म्हणत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
खऱ्या अर्थाने ना. धों. महानोर हे कृषी प्रधान आयुष्य जगले. राजकारणातही त्यांचा मोठा सहभाग होता. मात्र राजकारण करत असतानाही त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाची विचारसरणी मांडली नाही. तर त्यांनी फक्त सांस्कृतिक विषयचीच सभागृहात मांडणी केली, असं सांगायलाही फ. मु. शिंदे विसरले नाहीत.
शेतकरी आत्महत्या रोखल्या जाव्यात. यासाठी नां धों. महानोर व्याकुळ झाले होते आणि या व्याकुळतेतून त्यांनी कविताही लिहिल्या. त्या आजही आपल्या मनाला भावतात. महानोर यांना मी श्रद्धांजली वाहणार नाही तर मी त्यांना आदरांजली वाहतो. त्यांना प्रणाम करतो, असं शिंदे म्हणाले.
ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनीही महानोर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
उद्धव ठाकरे यांचं ट्विट
निसर्गाशी एकरूप राहून ज्यांनी आपल्या लेखणीच्या जोरावर साहित्य विश्वाला खऱ्या अर्थाने समृद्ध केलं, ज्यांच्या साहित्यात आपल्याला निसर्ग विविध रूपांनी भेटला, मनाला भुरळ घालणारी रानगाणी ज्यांच्या लेखणीने अजरामर केली ते ज्येष्ठ लेखक, ‘निसर्गकवी‘ ना. धों. महानोर! त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी ही मातीच्या हरवलेल्या सुगंधासारखी आहे. रसिकांची निसर्गाशी नाळ जोडणाऱ्या ह्या रानकवीस भावपूर्ण श्रद्धांजली!
निसर्गाशी एकरूप राहून ज्यांनी आपल्या लेखणीच्या जोरावर साहित्य विश्वाला खऱ्या अर्थाने समृद्ध केलं, ज्यांच्या साहित्यात आपल्याला निसर्ग विविध रूपांनी भेटला, मनाला भुरळ घालणारी रानगाणी ज्यांच्या लेखणीने अजरामर केली ते ज्येष्ठ लेखक, ‘निसर्गकवी‘ ना. धों. महानोर! त्यांच्या जाण्याने… pic.twitter.com/eYcDXqhCPl
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) August 3, 2023