दादांनी मुख्यमंत्री व्हावं, अजित पवार यांच्या मातोश्रींची इच्छा; सुप्रिया सुळे यांची एका वाक्यात प्रतिक्रिया
Supriya Sule on Ajit Pawar Mother Statement About Maharashtra Chief Ministership : अजितदादाने मुख्यमंत्री व्हावं, अजित पवार यांच्या आईकडून इच्छा व्यक्त. च्या विधानावर सुप्रिया सुळे यांची एका ओळीची प्रतिक्रिया, सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या? वाचा ,सविस्तर...
रणजित जाधव, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, पुणे | 05 नोव्हेंबर 2023 : अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अशातच अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी आपली एक इच्छा बोलून दाखवली आहे. राज्यात आज ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. काटेवाडी ग्रामपंचायतीसाठी पवार कुटुंबाने मतदान केलं. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि अजित पवारांच्या आई आशाताई पवार यांनी मतदान केलं. यावेळी माझ्या देखतच अजितदादाने राज्याचं मुख्यमंत्री व्हावं, ही माझी इच्छा आहे, असं त्या म्हणाल्या. आशाताई पवार यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एका ओळीची प्रतिक्रिया दिली आहे. अर्थातच कोणत्याही आईला आपल्या मुलाने व्हावं, असं वाटतं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
अजित पवार यांच्या आजारपणावर म्हणाल्या…
अजित पवार यांच्या आजरपणावर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे. आजार होतो तेव्हा माणसाने आराम करायचा असतो. मला माहिती आहे. अजित दादांना आरामाची गरज आहे. आरोग्यमध्ये राजकारण आणणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसत नाही. हे माझं वैयत्तीक मत आहे. दादांची चौकशी रोजच करते. बर झाल्यावर मी त्याला भेटायला जाणार आहे. शेवटी तो माझा भाऊ आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
चांदणी चौकाची पाहणी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा, खासदार सुप्रिया सुळे या आज पुण्यात आहेत. पुण्यातील चांदणी चौक इथं त्यांनी भेट दिली. या पुलाची त्यांनी पाहणी केली. काही दिवसांआधी सुप्रिया सुळे यांनी चांदणी चौकातील रस्त्यांवरच्या खड्ड्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर त्यांनी आज या पुलाची पाहणी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
चांदणी चौकाच्या कामाबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या…
चांदणी चौकाबाबतही सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चांदणी चौकाच्या कामाची श्वेत पत्रिका काढा. नितीन गडकरी यांनी संपूर्ण देशात चांगले रस्ते केले. पण चांदणी चौकाच्या कामाला काय दृष्ट लागली कळायला मार्ग नाही. अधिवेशनात गडकरी यांची वेळ घेऊन हा विषय मी मांडणार आहे. पादचाऱ्यांचा विचार या ठिकाणी केला गेलेला नाही. अपघात व्हायची वाट का बघत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ शून्य अपघात करण्याचा आमचां मानस आहे. यात राजकारण कुठे ही करु नये, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.